पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी (ता. बार्शी) सह परिसरात बैलपोळा सण उत्साहात व दुष्काळी परिस्थतीमुळे तेवढयाच जड अंतकरणाने साजरा करण्‍यात आला. कितीही कर्ज झाल तरी चालेल पण वर्षभर शेतक-यांचा जवळचा मित्र असणा-यांना बैलांना त्याच्या सणादिवशी कोणतीच बळीराजा कमतरता करताना दिसुन येत नव्हता.
बैल पोळयाच्या आदल्या दिवशी बळीराजाने शक्य असलेल्या पाण्याच्या ठिकाणी आपली मुकी जितराबे घेऊन जावुन धुऊन वर्षभार भार सोसुन शेतक-यांना मदत करणा-या खांदयांची खांदेमळणीची कामे उरकुन घेतली होती. कृषीप्रधान देश अशी ओळख असलेल्या भारतात बैलपोळा सणादिवशी दिवसभर आराम दिला गेला होता. बैल पोळा असल्यामुळे त्यांच्याकडुन शेतक-यांनी कोणतीच कामे करून न घेता उलट त्यांच्या अंगावर गेरूचे ठिपके, गळयात चंगाळी, कवडया, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, पायात चांदीचे अथवा करदोडयाचे दोरे, कपाळावर रंगीबेरंगी झुल यासह नवीन वेसन, कासरा आदी थाटमाट करून त्यांना गावाच्या वेशीपासुन वाजत गाजत घरापर्यंत घेऊन गेले होते. गावात आपलाच सर्जा राजा कसा उठून दिसेल यासाठी प्रत्येक शेतकरी प्रयत्नशिल असल्याचे पहावयास मिळत होते. घरी गेल्यानंतर घरातील सवासिनिंनी औक्षण करून बैलांना पोळीचा गोड नैवेदय देऊन पोटभर चा-याचा आस्वाद त्यांना देण्‍यात आला होता.
  बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्‍यासाठी साजरा करण्‍यात येत असलेल्या या सणादिवशी ज्या शेतक-यांकडे बैल जोडी नाही ते मातीच्या बैलाची रंगरंगोटी करून त्यांची विधिवत पुजा करून बैल पोळयाचा ऊत्सव साजरा करतात. या सणादिवशी गाडी, नांगर आदी कोणत्याच शेतीच्या कामासाठी बैलांना जुपले जात नाही. वर्षातुन एकदाच येणा-या या सणादिवशी बैलांना वेगळेच महत्व देऊन त्यांचा मानपान केला जातो व त्यादिवशी मारहाण करणेही शेतक-यांकडुन टाळले जाते.
  काल सकाळपासुनच पांगरीत आपल्या बैलांना वाजत गाजत सजवुन घरी घेऊन जाण्‍यासाठी शेतकरी धडपडत असल्याचे पहावयास मिळत होते. भिषण दुष्काळाची छटा समोर उभी असतानाही शेतक-यांनी उसनवारी करु घरातील किडुक-मिडुक विकुन बैलपोळा उत्साहात साजरा केला.
 
Top