नागपूर :- बुद्धमं सरणं गच्छामि, धम्ममं सरणं गच्छामि!.च्या मंत्रघोषात विजयादशमी दिनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर ५९ वा धम्मचक्र प्र्वतन दिन उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र तसेच देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भीमानुयायांचा सागर दीक्षाभूमीवर उसळला होता.
     नागवंशीयांच्या नागपूरात १४ ऑक्टोबर १९५६ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो समाजबांधवांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशात एक नवी धम्मक्रांती केली होती. तो दसरा, ‘विजया दशमी’चा दिवस बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी निवडला होता. त्यामुळे हा दिवस दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
     शुभ्र वस्त्रे, पंचशील ध्वज आणि ‘जय भीम’चा नारा देत गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधवांनी दीक्षाभूमीवर तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर केला.
     दीक्षाभूमीवरील बोधीवृक्षाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्या रोपट्याचा तो बोधिवृक्ष आता बहरला आहे.
      याच बोधिवृक्षाखाली भिक्खू संघाचे सूत्तपठन सुरू होते. तसेच देशविदेशातून आलेले शेकडो भिक्खूही या पूजेत सहभागी झाले होते. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने होणारी गर्दी पाहता बुधवारी आदल्या दिवशीच बौद्ध बांधवांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. दीक्षाभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
     दीक्षाभूमी परिसरात गुरुवारी सकाळपासूनच विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती. दीक्षाभूमी परिसरात फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीतील अनेक ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.
 
Top