तुळजापूर  -   श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सवास महाराष्ट्रसह आंध्र प्रदेश, कर्नाटक  या राज्यामधून यात्रेकरु मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. या भाविकांना तत्पर सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मंदिर संस्थानसह विविध यंत्रणा काम करीत असल्याचे चित्र तुळजापूरनगरीत पाहायला मिळाले. 
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची पावले मंदिराच्या दिशेने वळत आहेत. यंदा धर्मदर्शन आणि मुखदर्शनासाठी स्वतंत्र दर्शनरांगांची व्यवस्था करण्यात आल्याने गर्दी वाढली तरी भाविक शिस्तबद्धरित्या दर्शन घेत असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. यावर्षीपासून राजे शहाजी महाद्वार येथून दर्शनरांग बंद करण्यात आली आहे. त्याची माहिती भाविकांना व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलक लावून तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे त्यांना माहिती दिली जात आहे. दर्शनरांगांतील बदल भाविकांना समजावून सांगण्यासाठी ठिकठिकाणी दिशादर्शक फलकही लावण्यात आले आहेत. 

  मंदिरात दर्शनासाठी भावीकांची गर्दी जरी असली तरी पोलीस यंत्रणा जागोजागी थांबून गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत. भावीकांना आई तुळजा भवानीच्या दर्शनासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे व पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा घेत आहे. 
   शहरामध्ये येणा-या वाहनासाठी नगर पालिकेने वेगवेगळया ठिकाणी वाहनतळ उभारल्यामुळे वाहनाचा त्रास चालणा-या भावीकांना होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. एस. टी स्टॅन्डवर भावीकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष गाड्यांची सोय, ध्वनीक्षेपनाद्वारे वेळोवेळी सूचना देणे, त्यांच्या साठी लॉकर्स रुम्सची व्यवस्था करण्यात आली आहे. 
आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेल्या प्रथमोपचार केंद्रांचा चांगल्या प्रकारे लाभ भाविकांनी घेतला. ज्यांना त्रास होतोय, असे भाविक येथे तपासणी करत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसत होते. 
 श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक दिपाली घाटगे, पोलीस उपविभागीय अधिकारी प्रियंका भगत-नारनवरे तळ ठोकून असून आपल्या सहकाऱ्यांसह कायदा आणि सुव्यवस्था तसेच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्पर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंदिर व आसपासच्या परिसराची सीसीटीवीद्वारे पाहणी केली जात असून प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा कार्यरत असून त्यादृष्टीने ठिकठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
भावीकांना त्रास होवू नये, म्हणून वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आला असून त्याची माहिती प्रत्येक ठिकाणी फलकाद्वारे केली जात आहे. मंदिर परिसर आणि शहरातही अधिकाधिक स्वच्छता राहावी, यासाठी नगरपालिका यंत्रणा अहोरात्र काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.   
तत्पूर्वी मंगळवारी रात्री पहिल्या माळेच्या दिवशी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आले. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात छबिना मिरवणूक काढण्यात आली. प्रक्षाळ पूजा झाली. नगराध्यक्ष जयश्री कंदले, मंदिर संस्थानचे तहसीलदार सुजित नरहरे, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी उपस्थित होते. याशिवाय भोपे, पुजारी, आराधी, गौंधळी व भाविक मोठ्या संख्येने  यावेळी उपस्थिती होती        

 
Top