उस्मानाबाद- तालुक्यातील अंबेजवळगे येथील रेणुका देवीच्या मंदिरात नवरात्र महोत्सवाला भक्तीपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. यानिमित्त येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मंदिरात रेणुकामातेच्या मूर्तीची १२५ वर्षांपूर्वी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यामुळे येथील नवरात्र महोत्सवाला १२५ वर्षांची परंपरा आहे. माहूरच्या रेणुकामाता देवीचे प्रतिरूप या मूर्तीला म्हटले जाते. येथे महाअभिषेक, महापूजन करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी गावातील आराधी मंडळींनी आराधी गिते सादर केली. मंदिरात रोज सकाळी व रात्री देवीची आरती करण्यात येत आहे. तसेच अनेक भाविक परंपरेनुसार उपवास करून मंदिरात देवीची उपासना करत आहेत. मंदिरातील कार्यक्रमांमुळे गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.