पांगरी (गणेश गोडसे) :- पक्ष्यांने आकाशात कितीही उंच भरारी घेतली तरी त्याला ओढीपोटी शेवटी जमिनीवर यावेच लागते त्याप्रमाणेच माणूस कितीही विखुरला तरी त्यालाही आपल्या मातीची ओढ असतेच. याचाच प्रत्यय पांगरी भागातील अनेक गांवामधील जुन्या जाणत्या लोकांना आला आहे. जगभरात उद्योग धंदे, व्यवसाय, नौकरी आदी माध्यमातून पांगरी परिसरातील विविध गावातील तरुण विखुरलेले होते. मात्र ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी इमान राखत आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून उच्च पदस्थ युवकांनी गैर राजकीय पद्धतीने एकीची मूठ आवळत समाजसेवी संस्थेची स्थापना करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या प्रयोगाला नुकतीच सुरुवात केली आहे.
आज समाजात तरुणाच्या नावाने खडे फोडण्याचे काम होत असतानाच आमच्यात अजूनही सामाजिक भावना,संवेदना जागृत आहेत याचा संदेश देणारे तरुण आजच्या समाजातही असल्याचे दिसून येत आहे.पांगरी भागातील विविध क्षेत्रातील नामांकित उद्योगी तरुणांची बैठक नुकतीच पार पडली.माणुसकी हरवत चाललेला समाज,दिशाहीन होत असलेला तरुण,आरोग्य,वीज,पाणी आदि विषयांवर चर्चा होऊन यात बादलाव आणण्यासाठी पांगरी पंचक्रोशी युवा मंचची स्थापना करून त्याच्या माध्यमातून विविध गांवात सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प करण्यात आला.यावेळी रूपाली नारकर,निर्माते दिग्दर्शक अशोक घावटे,माहिती व जनसंपर्क अधिकारी इरशाद बागवान,सुखदेव नारायणकर,रेल्वेचे सरकारी वकील श्रीधर जावळे,उद्योगपती शितल जानराव,डॉ.अरिफ शेख,वन अधिकारी रामदास घावटे,लक्ष्मण घावटे,पांडुरंग राऊत,शाम शिकेतोड,धनंजय तौर,आनंद मोरे,दादा जानराव,रवी माळी,बाळू जानराव,दत्ता घावटे,धनंजय झालटे,परवेझ काजी,पिंटू वासकर,पत्रकार गणेश गोडसे ,आबा घावटे यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित होते.