
श्री. बागडे यांनी रविवारी साईनगर, रांजणी, ता. कळंब येथील नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडमार्फत रांजणी गावास शुद्ध पाणी देण्यासाठी आरओ प्लान्टचे उदघाटन केले तसेच कारखान्याच्या सन 2015-16 चा 16 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ केला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परीषद अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, आमदार प्रा. संगीता ठोंबरे, माजी खासदार गोपाळराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष व मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य बी.बी. ठोंबरे, शिवाजीराव नाडे, जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, नितीन काळे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. बागडे म्हणाले की, खासगी कारखान्यांच्या आगमनानंतर सहकारी कारखान्यांतही ते चांगली चालवण्याची स्पर्धा लागली आहे. जे कारखाने व्यावसायिक पद्धतीने चालू नाहीत, त्यांना अडचणी निर्माण झाल्या. मात्र, बाजारपेठेची गरज आणि शेतकऱ्यांची निकड ओळखून त्याप्रमाणे कारखानदारीत बदल करणाऱ्या आणि केवळ साखरेवर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीवर भर देणाऱ्या कारखान्यांनी आर्थिक अडचणींवर मात केली आहे. नॅचरल शुगर हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे श्री. बागडे यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना दुध व्यवसायासारखा पूरक व्यवसाय उपलब्ध करुन देण्यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे ते म्हणाले.
सध्याच्या टंचाई परिस्थितीमुळे यापुढे तरी निसर्गाकडून मिळणारा पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. बाहेरुन कोठून तरी पाणी आणून ते उपलब्ध करुन देण्याने पिण्याच्या पाण्याची गरज भागेल, मात्र, शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचे काय, अशी विचारणा त्यांनी केली. त्यामुळेच पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत अडवला पाहिजे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून चांगले काम झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. विहीर पुनर्भरण, पावसाचे पाणी संकलन यापुढील काळात आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
त्यानंतर श्री. बागडे यांनी येवती (ता. उस्मानाबाद) येथील लोकसेवा समिती संचलित चारा छावणीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पशुखाद्याचे प्रातिनिधीक स्वरुपात शेतकऱ्यांना वाटपही केले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यावेळी लोकसेवा समितीच्या वतीने दहा हजार रुपयांचा धनादेश त्यांनी प्रदान केला. यावेळी त्यांनी तेथील लोकसेवा समिती संचलित आश्रमशाळेलाही भेट दिली.
यावेळी श्री. ठोंबरे यांच्यासह ॲड. मिलींद पाटील, संजय निंबाळकर, संजय पाटील दूधगावकर, कमलाकर पाटील, शेषाद्री डांगे, नितीन काळे, अनिल काळे, रामदास कोळगे, उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तहसीलदार सुभाष काकडे, नायब तहसीलदार राजेश जाधव उपस्थित होते.