उस्मानाबाद :- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या प्रकाशाचे आनंदगाणे या कार्यक्रमाने उस्मानाबादकरांना तब्बल तीन तासाहून अधिक काळ खिळवून ठेवले. भावगीत, भक्तीगीत आणि कवितांचा त्रिवेणी संगम, बासरी, तबल्याची दिलखेचक जुगलबंदी, नव्या दमाच्या गझलकारांचे दमदार सादरीकरण, ताल धरायला भाग पाडणारा नृत्याविष्कार, अशा एकाहून एक सरस कलाकृतींच्या अनुभूतीचा प्रत्यय रविवारी उस्मानाबादकरांनी अनुभवला. निमीत्त होते उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघ आणि उस्मानाबाद व्हॉट्सअॅप ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सदाबहार संगीत मैफलीचे.
प्रारंभी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायक श्रीराम पोतदार, प्रा. राहुलदेव कदम, आसावरी जोशी या त्रयिंनी उपस्थितांना अक्षरश: आपल्या स्वरांच्या पाशात बांधून ठेवले. कधी पंडित भीमसेन जोशी यांचा अभंग, तर कधी नवोदित कवितांना दिलेला स्वरसाज उपस्थितांना भारावून गेला. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, सुरेश वाडकर, जितेंद्र अभिषेकी यांच्या बाजाची पोतदार यांनी केलेल्या मिमिक्रीमुळे सभागृहात हास्याचे लोट उसळले होते. प्रा. राहुलदेव कदम यांनी सादर केलेल्या संतोष नारायणकर, सतीश दराडे, वैभव देशमुख आणि शेखर गिरी यांच्या गझलांना नाट्यगृहातील रसिकांनी डोक्यावर घेतले. आसावरी जोशी यांच्या शुक्राची चांदणी या लावणीने कार्यक्रमात अधिक उत्साह भरला. शेखर गिरी आणि सतीश दराडे या तरूण गझलकारांनी आपल्या दमदार रचना सादर करून उपस्थितांना दखल घेण्यास भाग पाडले. व्हायोलीन शिवाजी पोतदार, सिंथ सिध्दार्थ सूर्यवंशी तर तबल्याची साथसंगत संतोष लोमटे यांनी केली. सलग चार तास सुरू असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन कवी रविंद्र केसकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, उपाध्यक्ष देवीदास पाठक, सरचिटणीस विशाल सोनटक्के, नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत, प्रदीप मुंडे, सोमनाथ गुरव, दत्ता कुलकर्णी, डॉ. धीरज वीर, सुरज साळुंके, अमित मोदाणी, अनिल मंजुळे, अॅड. नितीन भोसले, प्रशांत पाटील, बलराज रणदिवे, कैलास पाटील, पंकज पाटील, इंद्रजित देवकते, दै. सकाळचे सहयोगी संपादक दयानंद माने, सयाजी शेळके, कमलाकर कुलकर्णी, संजय मंत्री, हुंकार बनसोडे, अमर भातलवंडे, राहुल कुलकर्णी, अक्षय ढोबळे, अनिल केसकर, दर्शन कोळगे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य आणि व्हॉट्सअॅप गु्रुपचे सदस्य, तसेच पालिकेचे अभियंता भारत विधाते, स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बासरी-तबला जुगलबंदीने रसिकांना जिंकले
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला गुणी तबलावादक खंडेराव मुळे आणि देगलूर येथील बासरीवादक ऐनोद्दीन वारसी यांनी कार्यक्रमावर आपली छाप टाकली. बासरी आणि तबल्याच्या जुगलबंदीने या ऐतिहासिक कार्यक्रमात रसिकांच्या मनावर राज्य केले. दोघांची जुगलबंदी सुरू असताना सभागृहात टाळ्यांचा पाऊस कोसळत होता. या दोघांच्या जुगलबंदीचे क्षण टिपण्यासाठी अनेक रसिक हातातील मोबाईल उंचावून हा क्षण कॅमेराबंद करीत होते.
उस्मानाबाद शहरात फोर-जी वाय-फाय सुरू होणार
प्रकाशाचे आनंदगाणे कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उस्मानाबाद शहरात लवकरच रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने फोर-जी वाय-फाय सेवा सुरू केली जाणार असल्याचे जाहीर केले. रिलायन्स कंपनीने नांदेड जिल्ह्यातील इस्लामपूर शहरात वाय-फाय सुरू झाल्यानंतर आता उस्मानाबादमध्येही 20 हॉटस्पॉट कार्यान्वित करून संपूर्ण शहर वाय-फायने जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाच्यावतीने उस्मानाबादकरांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतूक केले. तसेच पत्रकार संघाला समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी एक लाख रूपयांची मदतही त्यांनी यावेळी जाहीर केली.
सोशल मिडीयातून सकारात्मक संदेश
पत्रकार संघ आणि उस्मानाबाद व्हॉट्सअॅप ग्रुपच्यावतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम ऐतिहासिक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नाट्यगृहाच्या अभावामुळे निर्माण झालेली सांस्कृतिक पोकळी या कार्यक्रमाने भरून काढली. उत्कृष्ट ध्वनीसंयोजक व्यवस्था, पाहताक्षणी भुरळ पाडेल अशी प्रकाशव्यवस्था, रसिकांना पुरेपूर आनंद मिळावा यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्यांनी घेतलेली मेहनत, पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलेले योगदान कौतूकास्पद असल्याची भावना सभागृहातून बाहेर पडणारा प्रत्येकजण व्यक्त करीत होता. पुढील काळातही या नाट्यगृहात सांस्कृतिक चळवळीला पूरक कार्यक्रमाचे आयोजन होत रहावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.