चाळीसगाव :- गोंडगाव (ता. भडगाव) येथील महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवार रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोंडगाव येथील शीलाबाई छोटू मोरे (वय 35) ही महिला कालपासून (ता. 15) आपल्या दहा व सहा वर्षीय मुलांसह बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता, ती कुठेही मिळून आली नाही. आज सकाळी गावालगतच्या विक्रम पाटील यांच्या शेतात तिघांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. शीलाबाईच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून तिच्या पतीचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. तिचे ओढरे (ता. चाळीसगाव) येथील माहेर आहे. शीलाबाईने मुलांसह आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, सात महिन्यांपूर्वी गोंडगावलाच एका महिलेने आपल्या दोन मुलांसह विहिरीतच उडी घेऊन आत्महत्या केली होती. तसाच प्रकार पुन्हा घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.