नळदुर्ग :- फुलवाडी (ता. तुळजापूर) येथे शांतीर मर्बे ते इराय्या स्वामी शेतरस्त्यास मंजूरी मिळूनही काम सुरुवात करण्यास प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. त्यामुळे ऐन दुष्काळामध्ये काम शोधण्यासाठी मजुराना बाहेर ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. याप्रकरणी तातडीने जिल्हाधिका-यांनी लक्ष घालून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गतची दुष्काळी कामे तातडीने सुरु करुन मजुरांची उपासमार थांबविण्याची मागणी कामधेनू संस्थेचे सचिव बळीराम जेठे यांनी केली आहे.
                      तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी हे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. यंदा भिषण दुष्काळ पडल्याने शेतक-यांसह शेतमजुरांची मोठे हाल होत आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तर दुसरीकडे हाताला काम नसल्याने शेतक-यांसह शेतमजुरांची उपासमार होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने दि. 25 जानेवारी 2016 रोजी 102 मजुरांनी पंचायत समिती तुळजापूरकडे कामाच्या मागणीचा अर्ज केला होता. कायदयाप्रमाणे पंधरा दिवसाच्या हात काम सुरु करावे लागते, मात्र अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे तीन महिने उलटून गेले तरीही कार्यारंभ आदेश न मिळल्याने काम मिळत नाही. ग्रामपंचायतीने वेळोवेळी पाठपुरावा करुनही आजतागायत मजुरांना कुठल्याही पध्दतीचे काम हाती आले नाही. त्यामुळे सरपंच विमल हजारे व उपसरपंच सुभाषचंद कुताडे यानी जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी सोमवार रोजी निवेदन दिले आहे. तरी तातडीने काम सुरु करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
 
Top