नवी दिल्ली :- बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून महाराष्ट्र
राज्यातील १०८
सिंचन प्रकल्पांची १ लाख ५५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. या योजनेंतर्गत राज्यातील ४० टक्के म्हणजेच तब्बल ३ लाख ७७ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. बुलढाणा, सातारा व, सांगली जिल्हयातील शेतकऱ्यांना या जलसिंचनाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. हा पावसाळा संपताच या जल सिंचन योजनेचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी जाहीर केले आहे.
राज्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आणि अर्धवट असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून राज्यातील सिंचन क्षमता 18 वरुन 40 टक्क्यांवर जाईल, असा दावा यावेळी नितीन गडकरी यांनी केला आहे. या योजनेत
मराठवाड्यातील 14, विदर्भातील 66असे एकूण 91 सिंचन प्रकल्प आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू, उमरोडी या महत्वाच्या प्रकल्पांचाही यात समावेश आहे. यामुळे सोलापूर, सांगली, साताऱ्यातील दुष्काळी भागांना फायदा होणार आहे. तसेच, बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत केंद्राकडून महाराष्ट्राला 40 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. याशिवाय, या सिंचन प्रकल्पामुळे राज्यातील अनेक अर्धवट प्रकल्प पूर्ण होणार आहेत. राज्यातील एकूण 108 प्रकल्प या योजनेतून पूर्ण होणार आहेत, असेही नितीन गडकरी म्हणाले.