नळदुर्ग :- दूध उत्पादकांना लिटरमागे थेट पाच रुपये अनुदान दयावे या व इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने अणदूर ता. तुळजापूर येथे गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता बसस्थानक शेजारी गावात जाणा-या रस्त्यावर म्हशीवर दुध सांडून आंदोलन करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावातुन शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतक-यांसह हलगी वाजवत बसस्थानक शेजारी एकत्र आले. यावेळी दुधाला दरवाढ मिळालीच पाहिजे, कर्जदार व बिगरकर्जदार भेदभाव न करता विमा भरुन घ्या, या घोष वाक्याचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद घोडके, तालुकाध्यक्ष बसवराज मुळे, राष्ट्रवादीचे दयानंद मुडके यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी दुधाला दरवाढ मिळावी, सर्व शेतक-यांचा एकत्रित पीक विमा अर्ज स्विकारावा, शेतजमीनी वरून गेलेल्या विजेच्या टॉवरचा मावेजा मिळावा, थकीत ऊसाचे बिल तात्काळ मिळावे, या प्रमुख मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी ए.एस. गांधले व नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव मिरकले यांना देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजीव घुगे, शहराध्यक्ष सदानंद हागलगुंडे, उपाध्यक्ष गुरुनाथ मिटकरे, सचिव महमद शेख, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष कल्याणी मुळे, प्रमोद काळे, बाळू काळे, काशिनाथ शेटे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा बंदोबस्त होता.