नळदुर्ग : येथील महामार्गावर बालाघाट महाविद्यालयासमोर एस.टी. बस थांबा आहे. माञ फलक नसल्यामुळे येथे बस थांबत नसल्याने बाहेर गावाहून येणा-या विद्यार्थी, पालक व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याठिकाणी त्वरीत विनंती थांबाचा फलक बसवण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून वारंवार करुनही उदासिन महाविदयालय
प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त
केला जात आहे.
नळदुर्ग येथील कला,
विज्ञान व वाणिज्य महाविदयालय सोलापूर रोडला बसस्थानकापासून एक ते दीड किलोमीटर
अंतरावर असून ग्रामीण भागातील विदयार्थी या महाविद्यालयात मोठयाप्रमाणावर शिक्षण
घेत आहेत. त्याचबरोबर शहरातील व्यंकटेश नगर, रामलिला नगर, व्यास नगर, इंदिरानगर, ठाकरे नगर आदी भागांतून नोकरी, शिक्षणासाठी दररोज असंख्य नागरिक, विदयार्थी सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा येथे एसटी बसने ये-जा करतात. तसेच ग्रामीण भागातून नळदुर्ग येथे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थींनी एस.टी. बसने येत असतात.
माञ बालाघाट महाविद्यालयाजवळ एस.टी. बसला थांबा असूनही फलकाविना अनेक वेळा बस थांबण्यावरून वाद झाल्याचे सर्वश्रूत आहे. परिसरातील बस चालक व वाहकांना याबाबत माहिती असल्यामुळे ते येथे बस थांबवतात. माञ इतर ठिकाणचे एसटी कर्मचारी या ठिकाणी नवीन असल्यामुळे बस न थांबवता नळदुर्ग बसस्थानकातच बस थांबवतात. यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी व विद्यार्थ्यांना शाळा काँलेजमध्ये पोहचण्यास उशिर होत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर सदर प्रवाशांना पुन्हा पायपीट करत एक ते दिड किलोमीटर अंतर पायी चालत महाविदयालय व परिसरात जावे लागते. यामुळे वेळ वाया जाऊन मनस्ताप सहन करावा लागतो. तरी महाविद्यालय व एस टी प्रशासनाने वेळीच याबाबीची दखल घेऊन बालाघाट महाविद्यालयासमोर बस थांबासाठी फलक लावावा अशी मागणी यापूर्वी प्रवाशी व विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.
बालाघाट महाविदयालयाचे
प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांच्याशी संपर्क साधले असता, बस थांबा विनंती फलक
लावण्याची जबाबदारी एस.टी. महामंडळाची असल्याचे सांगून येत्या आठ दिवसात महाविदयालयाच्यावतीने
फलक लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
नळदुर्ग बसस्थानकातील
वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, महाविद्यालयातील यापुर्वीचे प्राचार्य सुहास पेशवे, एस.एस. शिंदे, डॉ. मोहन बाबरे यांना वेळोवेळी संपर्क साधून विदयार्थ्यांच्या
सोयीकरीता फलक बसवण्यासंबंधी सांगतिले आहे.
मात्र आजतागायत फलक बसविल्याचे दिसत नाही. तरीही एस.टी. महामंडळाचे याबाबत सहकार्य राहील.