उस्मानाबाद :- तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करणार्या शिक्षिकेला खंडणी मागितल्याप्रकरणी उस्मानाबाद शहर पोलिसांनी अखेर देगलूर येथून अटक केली आहे. दि. 25 मे रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात संबंधित महिलेवर न्हा नोंद करण्यात आला होता. तेंव्हापासून संबंधित शिक्षिका फरार होती.
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याविरुध्द विनयभंगाची तक्रार करणार्या महिलेसह अन्य एक जणावर 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार त्यांची पत्नी उषा जगताप यांनी दि. 25 मे रोजी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खंडणी मागितली व घेतल्याच्या ध्वनी व चित्रफिती तपासून अधिक तपास सुरू केला होता. दोन महिन्यांपासून फरार असलेल्या पीडित शिक्षिकेला न्यायालयानेही दिलासा दिला नाही. अखेर पोलिसांनी तिला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले.
फिर्यादी महिलेने गुन्हा दाखल न करण्यासाठी 15 लाख रुपये मागितले होते त्यातील 7 लाख रुपये वसुल केले, उर्वरित रक्कम न दिल्यामुळे तिने खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची पत्नी उषा जगताप यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला होता. फिर्यादी महिला व तिच्यासोबत राहुल नलावडे हे 10 एप्रिल रोजी त्यांच्या घरी आले व जगताप यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंद करणार, अशी धमकी देत 15 लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार उषा यांनी त्यांचे दीर राजेंद्र व नातेवाईक विष्णू पायघण यांना सांगितला व पैशाची जुळवाजुळव करुन 7 लाख रुपये जमा केले व 12 एप्रिल रोजी राहुल नलावडे याचेकडे दिले मात्र उर्वरित रक्कम न दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप उषा जगताप यांनी केला.
