कळंब  (भिकाजी जाधव) :-
                    
जिल्ह्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्वच स्तरावर कार्यप्रेरीत होऊन शंभर टक्के मुले शिकण्याच्या दृष्टीने सर्व शिक्षक काम करत आहेत. मुलभूत क्षमता, अध्ययन निष्पत्ती प्रत्येक मुलांना प्राप्त करण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. या अनुषंगाने शिक्षकांचे सक्षमीकरण व्हावे, प्रयोगशील शिक्षकांच्या कामाचे सादरीकरण व्हावे, यासाठी कळंब तालुक्यातील लोहटा (पू.) केंद्रामध्ये जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद व शिक्षण विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.

या परिषदेत अध्ययन स्तर, निती आयोग, राष्ट्रीय संपादणूक चाचणी, अध्ययन निष्पत्ती, दिक्षा ॲप, सतत गैरसमज व शाळा बाह्य विद्यार्थी, पायाभुत चाचणी, नवोपक्रम व कृतीसंशोधन, शालेय पोषण आहार, समावेशीत शिक्षण आदी विषयावर शिक्षकांना माहिती देण्यात आली.

विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती चे  विश्लेषण,अध्ययन निष्पत्तीनुसार  वर्गाध्यापनाची दिशा कशी ठरवावी. कोणकोणत्या कृती, उपक्रम घेता येतील.त्यासाठी कोणकोणते अध्ययन स्त्रोत वापरावे लागतील? याबद्दल अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण केले गेले. निती आयोगातील सर्व मानके बद्दल शिक्षकांची जाणीवजागृती करण्यात आली. एनएएस परिक्षेबद्दल सखोल माहिती व एनएएस मधील संपादणूक पातळी वाढण्यासाठी अध्ययन निष्पत्तीवर कशा पद्धतीने काम करता येईल यावर यावेळी चिंतन करण्यात आले.

या परिषदेस केंद्रप्रमुख महेंद्र रणदिवे (केंद्रप्रमुख), शिंदे श्रीमंत, जयदेव चौरे (साधनव्यक्ती ) श्री नकाते (विषय तज्ञ IED) आदीजण उपस्थित होते. 

दरम्यान तुकाराम गरुडे ( विषय सहाय्यक )- जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था उस्मानाबाद यांनी शिक्षण परिषदेला भेट देऊन  शिक्षकांशी संवाद साधला. निती आयोग,अध्ययन निष्पत्ती अध्ययन स्तर,पायाभूत चाचणी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेचे प्रास्तविक व मार्गदर्शन  महेंद्र रणदिवे यांनी केले. तर आभार श्री विशाल वाघमारे यांनी मानले. या परिषदेसाठी 300 शिक्षक हजर होते.
 
Top