उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाचे मुखपृष्ठ असलेल्या लोकमान्य “लोकराज्य” मासिकाची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हयातील या वर्षातील पहिली लोकराज्य सामाजिक संस्था बनण्याचा मान क्रांतिवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गौर , ता.कळंब या संस्थेने पटकाविला आहे. या संस्थेच्या एकूण 101 सभासदांनी लोकराज्यचे वार्षिक सभासदत्व स्वीकारले आहे.
याप्रसंगी क्रांतिवीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अशोक लंगडे पाटील म्हणाले की, या संस्थेमार्फत जिल्ह्यात विविध लोककलांचे प्रदर्शन, सादरीकरण, व्यसनमुक्ती कार्यक्रम, स्वच्छता आणि आरोग्य विषयक बाबींवर जनप्रबोधन अशा विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक कार्य केले जाते. बळीराजा चेतना अभियानांतर्गत आमच्या संस्थेने गावोगावी अनेक कार्यक्रमही केले आणि अजूनही कार्यक्रम करीत आहोत.
जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी लोकराज्य मासिकाचे महत्त्व आम्हाला समजावून सांगितले आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आम्ही संस्थेसाठी वार्षिक सभासदत्व घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये आमच्या संस्थेच्या कोषाध्यक्ष सौ.संध्या पाटील यांचाही तितकाच सहकार्याचा वाटा आहे. आमची संस्था ही जिल्ह्यातील पहिली लोकराज्य सामाजिक संस्था झाली आहे याचा आम्हाला निश्चितच खूप आनंद झाला आहे.
खरेतर जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी या मासिकातील माहितीबाबत आम्हाला सखोल मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळेच आमची संस्था आम्ही लोकराज्य करू शकलो. यापुढे आम्ही ज्या गावांमध्ये कार्यक्रम करून त्या त्या ठिकाणी लोकराज्य मासिकाची माहिती ,माहिती व जनसंपर्क विभागाचे विविध उपक्रम तसेच विविध शासकीय विभागांच्या विविध योजना यांची माहिती आमच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.