तुळजापूर (दास पाटील) :- 

शहरात असलेल्या बहुतांश एटीएम मशीनमध्ये चलनाचा खडखडाट असल्याने नागरिकांसह भाविकांची मोठी अडचण होत आहे. शहराच्या विविध भागात असणार्‍या एटीएम केंद्रात हेलपाटे मारुन नागरिक आणि भाविक वैतागले आहेत.

तीर्थ क्षेत्र तुळजापूर हे श्रीतुळजाभवानी देवीचे जागृत देवस्थान आहे. अनेक भाविकांची कुलस्वामिनी असलेल्या देवीचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक भक्त येत असतात.

प्रवासातील सुरक्षिततेच्या कारणासाठी अनेक भाविक रोख रक्कम जवळ बाळगणे टाळतात. त्यातही सर्वत्र एटीएम सुविधा उपलब्ध असल्याने त्या त्या ठिकाणी एटीएमद्वारे रक्कम प्राप्त करण्याकडे बहुतेकांचा कल असतो.

परंतू मागील अनेक महिन्यांपासून तुळजापूर शहरात एटीएम मशीनमध्ये चलनाचा सातत्याने तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे ही एटीएम मशीन नेहमीच बंद असतात. एटीएम सुविधेमुळे नागरिकही रोख पैसे जवळ बाळगत नसल्याने एटीएम बंद असल्याने ऐनवेळी त्यांची धावपळ होते. एसबीआय वगळता बहुतांश एटीएम मशीनमध्ये एजन्सीमार्फत चलन भरणा केला जातो. मात्र भरणा करणारी एजन्सी मशीनमध्ये चलन भरणा करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. एसबीआयच्या एटीएम मशीनमध्ये बँकेमार्फत चलन भरणा केला जातो. परंतू आठवड्यातून एक किंवा देन दिवसच हे एटीएम चालू असते.

सातत्याच्या खडखडाटाने ग्राहकांसह भाविक वैतागले आहेत. या समस्येवर तात्काळ उपाययोजना करून शहरातील सर्व एटीएम केंद्रांना सुरळीत चलन पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

 
Top