काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटीसह, सावरगाव, सुरतगाव, येथे गुरुवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकल मराठ्यांच्या वतीने पुकारण्यात आलेला बंद आंदोलनास गाव बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आला. तर तामलवाडीत सकाळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा देत गावातून रॅली काढून आरक्षणासाठी महादेवाला अभिषेक करून सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यात आले. तर माळुंब्रा व सांगवी ( काटी ) येथे ठिय्या आंदोलन करुन सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 जवळपास तीन तास रोखून धरला होता. माळुंब्रा येथे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून संपूर्ण वहातूक बंद करण्यात आली होती. दुपारी आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे यांना मुख्यमंत्र्याना दिलेले निवेदन दिले. या आंदोलनात सर्व गावातील व्यवसायकांनी आपआपली दुकाने, पान टपरी, हाॅटेल्स, दुधसंकलन केंद्र, सेतु सेवा केंद्र, कापड दुकाने, पिठाची गिरणी, शाळा बंद ठेवून सहकार्य केले. तर सर्व समाजातील लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. माळुंब्रा व सांगवी (काटी) येथील ठिय्या आंदोलनामुळे तामलवाडी येथील टोलनाक्यावर व येथील अत्यंत वर्दळीच्या पोलीस ठाण्यासमोरील राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट दिसून आला.
काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा बंद अत्यंत शांततेत पाळण्यात आला असून या आंदोलनात सकल मराठा बांधवासह सर्व जाती धर्मातील लोकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता.