तुळजापूर (दास पाटील) :-

येथील नगरपरिषदेच्या गैरकारभाराचे सर्वत्र यापुर्वीच पुरते धिंडवडे निघाले असून आता आणखीन एक नवे प्रकरण पुढे आल्याने तुळजापूर नगरपरिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुळजापूर नगरपरिषद कार्यालयातील तत्कालीन लेखापाल अविनाश नरसिंगराव राऊत यांनी जवळपास 21 लाख शासकीय रकमेची अफरातफर केल्याप्रकरणी अखेर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुरुवार दि. २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. १३ एप्रिल २०१५ ते दि. २१ मार्च २०१७ या दरम्यानच्या कालावधीत आरोपी तत्कालीन लेखापाल अविनाश नरसिंगराव राऊत (रा. तुळजापूर) हे सन २०१५ ते सन २०१७ या कालावधीमध्ये न.प. मध्ये लेखापाल पदावर कार्यरत असताना वेळोवेळी एकूण २० लाख ९१ हजार ६९३ शासकीय रुपयांचा अपहार केला. स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता आपल्या बँक खात्यावर बनावट कागदपत्रे करुन, ते खरे असल्याचे भासवून रक्कम वर्ग करुन घेतली असल्याचे सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षण अहवालामध्ये सविस्तर नमूद करण्यात आले आहे.

संगीता हणमंतराव येलमेवाड (रा.काळेवाडी ता.जि.पुणे, हल्ली मुक्काम हडको, तुळजापूर) यांच्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात अविनाश उर्फ मुन्ना राऊत याच्या विरोधात गु.र.न. २५७/१८ भा.दं.वी. कलम ४००, ४२०, ४७१, ४७७(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपपोलीस निरीक्षक सुर्यवंशी हे करीत आहेत.

मागील काही वर्षांपासून तुळजापूर नगरपरिषदेची वेगवेगळी गैरकारभाराची प्रकरणे समोर आली आहेत. राजा माने यांच्या तक्रारीवरुन बहुचर्चित यात्रा अनुदान घोटाळा, घरकुल घोटाळा या प्रकरणात नगराध्यक्षांसह तत्कालिन मुख्याधिकारी, नगरसेवक, पालिकेचे अभियंता, कर्मचारी तसेच ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे सर्वश्रूत आहे. या प्रकरणातील अविनाश राऊत हे यात्रा अनुदान घोटाळ्यातील आरोपींपैकी एक आहेत. यात्रा अनुदान घोटाळा, घरकुल घोटाळा ही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. असे असताना लेखापाल राऊत यांचे अपहार प्रकरण पुढे आल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 
Top