काटी : तुळजापूर तालुक्यातील सावरगावच्या नागोबाची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमासह भरगच्च कार्यक्रमानी बुधवार रोजी नागपंचमीच्या दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भर पावसात उत्साहात पार पडली.  येथील  यात्रेत  नाग, पाल, विंचू  हे परस्परांचे हाडवैरी  असणारे उभयचर प्राणी  एकत्र येतात हे या यात्रेचे मुख्य वैशिष्टय़ असून यात्रेस पंचक्रोशीतील भाविकांसह मराठवाडा,  पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतक-यांसह भाविक आनंदाने चिंब झाले.

सावरगाव येथील नागोबा यात्रा यंदा शनिवार  दि. 11  ते 15 ऑगस्ट  या कालावधीत उत्साहात पार पडली. त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेत शनिवारी  आषाढ अमावस्ये दिवशी दुपारी साप, पाल, विंचू या उभयचर प्राण्यांचे मंदिरासमोरील  दगडी शिळेखाली  आगमन झाले. हे प्राणी एकत्रीत सलग पाच दिवस राहिले. बुधवार  दि. 15 ऑगस्ट  या  नागपंचमी दिवशी पहाटे नागोबा  मुर्तीला अभिषेक  घालून  दुपारी  तीन वाजता  गण व पालखीची गावातील  प्रमुख  मार्गावरून वाजत गाजत  मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मंदिर  परिसरातील  ओट्यावर  धान्य  व पाऊसाची भाकणूक पार पडली. यासह खरगा, गण असे विविध  धार्मिक कार्यक्रम  पार पडले.  

       शनिवारी अमावस्येदिवशी एकमेकांचे कट्टर  हाडवैरी  समजले जाणारे साप-पाल-विंचू या प्राण्यांच्या आगमनापूर्वी पुजारी कल्याण स्वामी यांना मानकरी हरीदास डोके या मानकऱ्यांच्या घरी अलका डोके व प्रगती डोके या सुहासिनीनी  आंघोळ घालून पाद्यपूजा  करून  महाराजांना मंदिरात नेण्यात आले. तेथे पुजारी  कल्याण स्वामी  यांना मानक-याच्या हस्ते  हाताला विधीवत कंकण  बांधण्यात येऊन यात्रेस प्रारंभ झाला होता. 

     15 ऑगस्ट नागपंचमी दिवशी पहाटे नागोबा मूर्तीस अभिषेक घालण्यास व नवसपुर्ती करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यंदा  मिरवणुकीपुर्वीच तुफान पाऊसाने सुरुवात  केली होती. भर पावसात  दुपारी 3:30 वाजता पुजारी कल्याण स्वामी यांच्या घरापासून गण  व पालखी मिरवणूकीस वाजत गाजत  नागनाथाच्या भजन जयघोषात टाळमृदंगाच्या निनादात प्रारंभ झाला. दुपारी  चार वाजता मारुती  मंदीरात संचार झाला. या मिरवणुकी दरम्यान ठिकठिकाणी सुवासिनींनी पालखीची पूजा करून दर्शन घेतले. मंदीरात मुख्य पुजारी कल्याण मल्लीकार्जुन स्वामी यांना खरगाची अंगोळ घालण्यात आली. सायंकाळी 5 वाजता मंदिराजवळ मिरवणूक आल्यानंतर तिथे महाआरतीने नागोबास ओवाळले गेले. त्यानंतर मंदिराशेजारी ओट्यावरच पाऊसातच  भाकवणूक कार्यक्रम पार पडला. 


या भाकवणूकीत यंदा अशी झाली भाकवणूक 
सायंकाळी सहा वाजता मंदीराजव॓ळील ओट्यावर  झालेल्या भाकवणुकीत तुर, ज्वारी,  हरभरा,  मिरची या पिकाच्या  उत्पादनात वाढ होईल   व यंदा  पाऊसमान चांगला असेल असे मंदिराचे मुख्य पुजारी कल्याण स्वामी यांनी भाकित सांगितले. भाकवणूक कार्यक्रमानंतर महाआरती होऊन यात्रेची सांगता झाली.

बाँब  शोधक पथकाकडून  पहाणी
यात्रेत  काही  अनुचित प्रकार  घडू नये  यासाठी  तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि अशोक चौरे यांच्या  मार्गदर्शनाखाली चोख पोलीस  बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  तर मंगळवारी दुपारी  पोलीस  निरीक्षक  उबाळे  यांच्या  नेतृत्वाखाली बाॅम्ब शोधक पथकाने  मंदीर  परिसराची पाहणी केली.   

ग्रामपंचायत व विविध  संघटनांचा  स्तुत्य  उपक्रम  
यात्रे निमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावात व नागनाथ  मंदीर  परिसरात  एकूण दहा  हायमास्ट  लॅम्प  लावण्यात  आले होते. याचे लोकार्पण  माजी जिल्हा परिषद सदस्य  संतोष  बोबडे,  सरपंच रामेश्वर  तोडकरी यांच्या हस्ते  करण्यात आले होते. त्यामुळे सावरगाव प्रकाशमय  झाले होते. तर भाविकांच्या सोयीसाठी मंदीराकडे जाणाऱ्या  रस्त्यावर  मुरुम  टाकण्यात आला होता. व वाहनांची  स्वतंत्र  पार्किंग व्यवस्था करण्यात आली  असल्याचे  सरपंच रामेश्वर  तोडकरी, उपसरपंच  आनंद  बोबडे यांनी दिली.   तर भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय येथील एस.एम. गृप, श्री गृप,  क्लासमेंट गृपच्या  वतीने करण्यात आली. 

 मोफत  चष्मे  वाटप 

जिल्हा परिषद सदस्य  महेंद्र  धुरगुडे यांनी आयोजित  केलेल्या  नेत्ररोग  शिबिरातील  गरजू रुग्णांना महेंद्र  धुरगुडे  यांच्या उपस्थितीत जि.प. सदस्य  राजकुमार पाटील यांच्या हस्ते  मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.  

फराळ वाटप
दत्तात्रय  लिंगफोडे यांच्या  वतीने कै. कालिदास  लिंगफोडे, कै. शांताबाई  कालिदास  लिंगफोडे  यांच्या  स्मरणार्थ   मंगळवारी  उपवासासाठी  फराळाचे वाटप करण्यात आले. 

तसेच तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली होती.  पन्नास  वर्षापासून डोके कुटूंबाचे विनामूल्य  माळा बनविण्याचे कार्य   लिंबाऱ्याच्या पाल्यापासून गोलाकार माळा बनविण्याचे काम हरीदास  विश्वनाथ डोके यांचे कुटुंबीय मागील  पन्नास  वर्षापासून विनामूल्य  करतात ते कार्य आजतागायत  सुरु आहे.  या तयार केलेल्या माळा नागपंचमीदिवशी गण मिरवणुकीत भाविकांना वाटण्यात आल्या. ही लिंबाऱ्याची माळ वर्षभर घरात अडकवतात त्यामुळे घरात सापांचा वावर होत नाही, अशी आख्यायिका आहे.

            यात्रा यशस्वी  करण्यासाठी विद्यमान सरपंच  रामेश्वर तोडकरी, उपसरपंच  आनंद बोबडे,  विनायक करंडे, प्रमोद माने, गौतम माने, अरविंद भडंगे, प्रताप माने, बाळासाहेब डोके, रामेश्वर ठेले,  उमेश महामुनी, महेश माने, सतिश कांबळे, निखल माने, विठ्ठल दरेकर, नेताजी कदम, बप्पा डोंगरे, अविनाश माने, अमोल माने, शकिल शेख, रंजीत भालेकर, बाळासाहेब  डोके, हरिदास  डोके, रामा कुंभार,   दत्तात्रय  लिंगफोडे,अण्णासाहेब  भालेकर, संजय कोळी,  दत्ता लिंगफोडे,  रामलिंग  गाबणे,  राजेंद्र  तोडकरी,   सिध्देश्वर  तोडकरी,   पिंटू  तानवडे,  महारुद्र  अक्कलकोटे,   बंडू तानवडे,  दत्ता  काढगावकर,  दादासाहेब  काढगावकर, रमेश  लिंगफोडे,  विठ्ठल  तानवडे,   योगेश  काढगावकर,  विजय  तानवडे,  बाळू  तानवडे आदींनी  परिश्रम घेतले. 

 =========================
- उमाजी गायकवाड

 
Top