तुळजापुर : कुमार नाईकवाडी
शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महावीर माणिकराव काटकर हे आपल्या विविध मागण्यासाठी सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजीपासून तुळजापूर तहसील कार्यालयासमोर जनावरांसह आमरण उपोषणास बसले असून शुक्रवार दि. 21 सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशीही त्यांचे आमरण उपोषण चालू होते.
तुळजापूर तालुक्यातील जे वडगाव काटी ते होनसळ गावच्या सिमेपर्यंत अतिक्रमण काढून पक्का रस्ता करावा या मागणीसाठी महावीर काटकर यांनी जिल्हाधिकारी यांना 3 ऑगस्ट 18 रोजी निवेदन दिले होते. परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्याने काटकर यांनी तहसीलसमोर ऑगस्ट महिन्यात लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी तहसीलदार यांनी तुमच्या गावातील काम पूर्ण होईल असे सांगून उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. परंतु दीड महिना लोटला तरी काम झाले नसल्याने काटकर यांनी सोमवारपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
शुक्रवार रोजी मनसेचे जिल्हा चिटणीस अमर राजे परमेश्वर, प्रमोद परमेश्वर, धर्मराज सावंत, समीर शेख, अमोल मोटे यांनी भेट देऊन मनसेचा पाठिंबा जाहीर केला. तर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी व अमीर शेख यांनी काटकर यांची भेट घेऊन त्यांना उपोषण सोडण्याची विनवणी केली. परंतु जोपर्यंत शासकीय प्रतिनिधी लेखी लिहून देत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका काटकर यांनी घेतली आहे.
