काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ते वडाळा या रस्त्याची प्रचंड खड्ड्यांनी चाळण झालेली आहे.या रस्त्यावरुन वाहनचालकांना व नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.केमवाडी येथील ग्रामस्थांनी यापूर्वीच लेखी निवेदन देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती.तसेच रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाची शक्यता व्यक्त केली होती.
या रस्त्यावरून तुळजापूर ते वडाळा तसेच काटी ते सोलापूर आदी बसेस तसेच मालवाहतूक, शालेय विध्यार्थी वाहतुक मोठ्या प्रमाणात होते.केमवाडी ते वडाळा हा रस्तातर अत्यंत बिकट झाला असुन जवळ जवळ 10 ते 15 फुट लांबीचे व 2 फुट खोलीचे खड्डे पडले असून सतत अपघात होत आहेत.त्यामुळे एस.टी.बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीच उस्मानाबाद येथील बांधकाम विभागाला रस्ता दुरुस्ती संबंधी लेखी निवेदन देऊनही संबंधीत विभागाने कसलीच दखल घेतली नाही. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अन्यथा पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा केमवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.

