तुळजापूर : कुमार नाईकवाडी
राज्यात घेण्यात येणा-या संपूर्ण स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तुळजापूर तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सरकारी अधिकारी होण्यासाठी महाराष्ट्रातील असंख्य विदयार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणा-या परीक्षा नवीन खासगी आयटी कंपनी नेमून घेण्याचे जाहीर केले असून विदयार्थ्यांकडून लाखो रुपये गोळा केल्याचे सांगून निवेदनात पुढे म्हटले आहे की, महापरिक्षा पोर्टल तयार करुन पाच ते सहा परीक्षा घेतल्या. या ऑनलाईन परीक्षेत प्रचंड गोंधळ व अपारदर्शकता असल्याच्या तक्रारी विदयार्थ्यांनी सरकारकडे केल्या होत्या. तसेच गुरुवार रोजी प्रहार जनशक्तीचे संस्थापक आमदार बच्चू कडू व प्रशासकीय अधिकारी यांच्यात या मुद्दयावरुनच वाद विवाद झाला होता. तरी प्रशासनाने राज्यात घेण्यात येणा-या संपूर्ण स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनाची एक प्रत तुळजापूर पोलीस ठाणे यांना देण्यात आली आहे.
या निवेदनावर प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, उपतालुकाध्यक्ष जुबेर शेख, तालुका सचिव अमिर शेख, तुळजापूर शहराध्यक्ष सनातन सौदागर, शहर उपाध्यक्ष सुनिल शिंदे, शहर सचिव कृष्णा सावंत, प्रहार अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष महादेव चोपदार, तालुका उपाध्यक्ष मारुती पाटील, हनुमंत मोरे, समाधान मगर, नागेश कुलकर्णी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
