नळदुर्ग : सचिन गायकवाड
प्लास्टिक बॅग्जपासून होणा-या पर्यावरणाचं नुकसान आज सर्वानाच माहीत आहे. जगात आज निव्वळ प्लास्टिकच्या वापरापासून होत नसेल इतकं नुकसान केवळ प्लास्टिक बॅग (थैली किंवा पातळ पिशवी)च्या वापरामुळे होत आहे. मुद्दा हा आहे की जगभरात प्लास्टिकची वाढती समस्या अधिकाधिक गंभीर बनत चाललीय. या समस्येचाच एक सर्वात मोठा भाग आहे प्लास्टिक पिशव्या. आज या पिशव्यांचा वापर आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे, असे मत डॉ. .प्रा. यू. एन. भाले यांनी मांडले.
नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे प्लास्टिक मुक्ती आयोजित कार्यक्रमात प्रा. भाले हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. आर.के. ढोकळे, प्रा. शिवाजी घोडके हे होते.
पुढे बोलताना प्रा. भाले म्हणाले की, एकदा निर्माण झालेलं प्लास्टिक हे कधीच नष्ट होत नाही. या उलट त्याचे तुकडे पडून ते इतरत्र जमिनीत, समुद्रात, नदी-नाल्यात मिसळत जाऊन ते प्राण्यांच्या तोंडी येतात. काही वेळेस असे प्राणी मनुष्याच्या पोटात गेल्यावर याच प्लास्टिकचा अंश आपल्याही पोटात जात असतो.या पिशव्या २० मायक्रॉनपेक्षा कमी असतात. या पिशव्यांचा कचरा ही आज जगाची सार्वत्रिक समस्या बनलेली आहे. हा कचरा गाळ बनून आपल्या, सांडपाणी वाहून नेणा-या पाईप्समध्ये, गटारांमध्ये, जमिनीत, नाल्यांमध्ये, नद्या व समुद्रात अडकून राहतो. असा कचरा साठल्यामुळे कित्येक कसदार जमिनी नापीक बनल्याची उदाहरणं आहेत.प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणं लोकांनी थांबवावं यासाठी आज जगात सर्वत्र समाजप्रबोधन केलं जातं. त्याला यशही मिळतं आहे. लोकांनी प्लास्टिक पिशव्यांचा कमीतकमी वापर करावा यासाठी त्यांना समजावलं जातं. त्यानुसार आज अनेकांनी या पिशव्या वापरणं कमी किंवा बंद केलेलं आहे.ङाॅ.प्रा. यू. एन. भाले यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष हंगरगेकर यांनी तर आभार प्रा. लता ढोणे यांनी मानले.
