अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात अस्थीरोग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले डॉ. विजय बुरांडे यांची आज २६ सप्टेंबर रोजी पहाटे -हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

डॉ. विजय हा माजी खा. काँ. गंगाधरअप्पा बुरांडे यांचा मुलगा असल्यामुळे आणि त्याचे संपुर्ण शिक्षण अंबाजोगाई येथेच झालेले असल्यामुळे तो तसा सर्व परीचित होता. अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदवी शिक्षण पुर्ण केल्यानंतर एम.एस. आर्थो. ची पदव्युत्तर पदवी त्याने नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केली. पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर ही डॉ. विजय याने आपले वडील काँ. गंगाधरअप्पांनी केलेल्या संस्कारामुळे अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातच नौकरी करण्यास प्राधान्य दिले. लेक्चरर, सहाय्यक प्राध्यापक असे टप्पे पार करीत डॉ. विजय प्राध्यापक (विभाग प्रमुख) पदापर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासाचा आधार घेत पोहंचला. 

अतिशय अभ्यासपुर्ण रोगनिदान आणि विशेषतः ग्रामीण भागातून या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आपुलकीची वागणुक देण्याचा प्रयत्न डॉ. विजय सतत करायचा. अस्थीरोग विभागातील आंतररुग्ण कक्षात राऊंड घेतांना अनेकवेळा डॉ. विजय  वृध्द महिला रुग्णांना आई, आज्जी आणि पुरुषांना बाबा, आजोबा म्हणून त्यांची आत्मियतेने वैद्यकीय सेवा करायचा.

      या विभागातील गरीब रुग्णांना मणक्याच्या आजारावर योग्य  उपचार मिळावेत म्हणून डॉ. विजय ने येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातच मणक्यावरील उपचार व मोफत  शस्त्रक्रिया करण्याची सोय मुंबई येथील प्रख्यात मणकेविकारतज्ञ डॉ. भोजराज आणि त्यांच्या सहका-यांच्या माध्यमातून केली. डॉ. विजय यांना गेली तीन-चार दिवसापासून चिकन गुनीयाचा त्रास होवू लागला होता. त्यामुळे ते घरीच होते. आज २६ सप्टेंबर रोजी पहाटे झोपेतच त्यांना -हदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी आठ वाजले तरी डॉ. विजय उठला नाही म्हणून त्यांच्या आईने विजयच्या रुमचा दरवाजा उघडला तेंव्हा डॉ. विजय अंथरुणात च आढळून आले. यानंतर त्यांच्या आईने अॅड. अजय यास फोनकरुन बोलावून घेतले. डॉ. विजय यांना तातडीने खाजगी रुग्णालयात केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. डॉ. विजय बुरांडे यांच्या पश्चात वृध्द आई, दोन मुले, पत्नी, भाऊ अॅड. अजय असा परीवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोहा या गावी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top