नळदुर्ग :

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथे ज्ञानकिरण बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि  टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता आणि आरोग्य या विषयावर जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुळजापूर पंचायत समितीचे सभापती शिवाजीराव गायकवाड हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा परिषदचे स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे जिल्हा समन्वयक रमाकांत गायकवाड, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे गणेश चादरे यांच्यासह  येथील माजी उपसरपंच नागनाथ गरड, ज्ञानकिरण  सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ कानडे सहशिक्षक महादेव गरड,उमेदच्या समुह साधन व्यक्ती केशर जाधवर, पत्रकार सचिन गायकवाड, सुधाकर गायकवाड, प्रा. सुमन सरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

आरोग्यदायी जीवनासाठी स्वच्छतेतून समृद्धीकडे मार्गक्रमन करण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता ही महत्त्वाची आहे यासाठी   संस्थेच्या वतीने "स्वच्छता आणि आरोग्य" यासंबंधी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील लोकांनी ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग नोंदवून पुढाकार घेण्याचे आवाहन सभापती शिवाजीराव गायकवाड यांनी केले तर उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून याकडे विशेषतः महिलांनी लक्ष केंद्रित करावे, शौचालयाचे बांधकाम करून त्याचा योग्य तो वापर करावा, सुदृढ पिढी निर्माण व्हावी यासाठी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तरच सक्षम समाज निर्मिती होईल असे मत रमाकांत गायकवाड व गणेश चादरे यांनी व्यक्त केले. 

प्रारंभी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे मित्र स्वयंदीप, मीरा बजाज ,निवेदिता कृष्णमूर्ती, मानसी वाधवा चारुल महेंदीरत्ता या विद्यार्थ्यानी गावातील सार्वजनिक ठिकाणी गाव नकाशा रेखाटला. शिवाय स्वच्छतेवर आधारित लघुचित्रपट व  नुक्कड हे नाटक विद्यार्थी कलाकाराने सादरीकरण करून स्वच्छतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भैरवनाथ कानडे यांनी केले तर सूत्रसंचालन सत्यवान गायकवाड यांनी केले हरिदास बेले यानी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास गावातील नागरिक महिला युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top