अणदुर : सचिन तोग्गी
अणदूर ता. तुळजापूर येथील श्री १००८ भ.महावीर दिगंर जैन मंदिरात पर्युषण पर्व २०१८ धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
दि. १० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर पर्यंत अनंत व्रत व षोडशकारण व्रतामध्ये बहुसंख्य महिला सहभागी झाल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. या कालावधीत मेरू पूजन, कुंभ मिरवणूक व पालखी मिरवणूक काढून अहिंसा व्रताचा जागर करण्यात आला. जैन सिद्धांत प्रसारक मंडळाचे अध्यक्ष धर्मानुरागी जिवनदादा पाटील यांनी पर्युषण पर्वात दशलक्षण धर्माचे प्रबोधन व्हावे, या उद्देशाने पूर्ण मराठवाड्यात व पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करून व्याख्यात्यांच्या नियुक्ती केल्यामुळे अणदूर मध्येही नेमचंद आग्रे, प्रा. रवींद्र काळे, उजनीच्या माजी सरपंच सौ .ललिता मोतीचंद जंगमे या तिघांचे व्याख्यान झाले. दशलक्षण धर्म हा केवळ जैन धर्मीयांसाठी नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरक आहे. विशेष करून बालमनावर दशलक्षण धर्माचे प्रबोधन होणे, हि काळाची गरज आहे, हेच व्याख्यानाचे सार होते. उत्तम क्षमा, उत्तम मार्जव , आर्जव , शौच, सत्य, संयम, तप,त्याग, अकिंचण्य व उत्तम ब्रह्मचर्य या दहा संस्कारक्षम दशलक्षण धर्माचे जीवनात पालन केल्यास मानवजातीचे कल्याणच होणार असल्याचा संदेश व्याख्यानातून देण्यात आला.
चढाव व पालखी मिरवणुकीने पर्युषण पर्वाची सांगता झाली. यावेळी मानाच्या मोठ्या कलशाचा मान प्रा. प्रसन्न कंदले यांना मिळाला. पर्युषण पर्वातील सर्व उपक्रम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कंदले यांच्या अधिपत्याखाली येथील श्रावक चंद्रशेखर कंदले, अजित कस्तुरे यांच्या आयोजनातून पार पडले. पांडुशिलेचे पूजन डॉ. सुभाष कस्तुरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. पर्युषण पर्वच्या सुरुवातीपासून भालचंद्र कंदले, चंद्रशेखर कंदले, महावीर कंदले, रमेश कंदले, वालचंद कंदले यांचा सहभाग होता. यावेळी धन्यकुमार कस्तुरे, मनोज कस्तुरे, अतुल कस्तुरे, सुनील कस्तुरे, प्रशांत कस्तुरे यांची उपस्थिती होती.
