अणदूर : प्रसन्न कंदले
आजच्या धावपळीच्या जीवनात वाहतुकीचे नियम पाळणे काळाची गरज आहे. तरुणांनी वाहतुकीचे नियम पाळून देशाची सेवा करावी, असे मत सोलापूर येथील सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राध्यापक सारंग तारे यांनी व्यक्त केले.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आयोजित " वाहतूक जनजागृती" या विषयावर प्रा. सारंग तारे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रा. तारे हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जवाहर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीना जाधव या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सुमेध पाठक यांच्यासह कार्यक्रमाधिकरी प्रा.डॉ.राठोड जी.टी. यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये बोलत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे(एन एस एस) जिल्हा समन्वयक तथा कार्यक्रमाधिकारी प्रा.सूर्यकांत आगलावे यांनी जवाहर महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन आजपर्यंत केलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली व गावोगावी घेण्यात आलेले शिबिर यशस्वी करण्या करिता ग्रामपंचायत, गावातील विविध समित्यांचे पदाधिकारी व ग्रामस्थांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट केले. तसेच यापुढील दहा दिवसात महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत "स्वच्छता ही सेवा " हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रा.डॉ.राठोड जी.टी. यांच्यासह एन एस एस प्रतिनिधी सागर चव्हाण यांनीही आपली मनोगते व्यक्त केले. यावेळी सर्व प्राध्यापक बंधू - भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.सरोजा इसाके या विद्यार्थिनीने केले तर प्रा.डॉ.एम.बी.बिराजदार यांनी आभार मानले.

