बार्शी (गणेश गोडसे) :-
सरकारी नियमानुसार संपूर्ण फी जमा करूनही शाळा व्यवस्थापनाने बेकायदेशीरपणे आकारालेल्या फी ला विरोध केल्याने व पालकांनी अपूर्ण फी भरली असल्याचे अजब कारण पुढे करीत परमप्रसाद चॅरीटेबल ट्रस्ट संचलित बार्शी येथील सेंट जोसेफ इंग्लिश मेडीयम स्कूलच्या सुमारे शंभर ते दिडशे विद्यार्थ्यांना शाळा अंतर्गत परिक्षेला बसू न देता या सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या खोलीत बसवून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार पालकांनी निदर्शनास आणून दिल्याने व याप्रकरणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिका-यांनी शाळा व्यवस्थापनाला शाळेची मान्यता काढून घेण्याचा इशारा दिल्यानंतर या विद्यार्थ्यांची दुपारी परीक्षा घेण्यात आली. या प्रकारामुळे सेंट जोसेफ स्कूलचा मनमानी कारभार पुन्हा एकदा उजेडात आला आहे़.
या बाबत अधिक माहिती अशी की, अनेक आंदोलनानंतर सेंट जोसेफ इंग्लिश स्कुल मध्ये पालक-शिक्षक यांची एक समिती नेमण्यात आली असून या समितीपुढे शाळा व्यवस्थापनाने खर्चाची माहिती देत फि बाबतचा आराखडा तयार करुन तो कार्यकारी मंडळाने निश्चित करायचा असा नियम आहे़. मात्र शाळा व्यवस्थापन कोणतीच कायदेशिर प्रक्रिया पार न पाडता मनमानीपणे फी निश्चीत करते व ती देण्यासाठी पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या मागे तगादा लावते. मागील दोन वर्षांपासून शाळेने स्मार्ट क्लास बनवण्याच्या नावाखाली मोठी फी आकारली होती. मुलांच्या अभ्यासासाठी चांगला निर्णय असल्याने पालकांनी निमुटपेण दोन वर्ष सदर फी भरली.मात्र सर्व वर्गखोल्या स्मार्ट क्लास बनलेल्या असतानाही चालूवर्षीही वाढीव फी आकारण्यात आली आहे. याला पालकांनी विरोध केला आहे. तसेच शाळेच्या वतीने अकरा अॅक्टिव्हिटी राबवल्या जातात. त्या अॅक्टीव्हिटींसाठी शाळेने प्रत्येक विद्यर्थ्यांकडून सुमारे चार हजार रूपये फी वसूल केली आहे. पालकांनी यास विरोध केला असून आमचा पाल्य ज्या अॅक्टिव्हिटी मध्ये सहभागी होईल त्याच अॅक्टिव्हिटीची फी आकारण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली होती.
हाच वाद तालुका गटशिक्षणाधिकारी विष्ण कांबळे यांच्याकडे चालू होता. या बाबत योग्यत्या प्रमाणात फी भरण्याचे गटशिक्षणाधिकारी व पालकांनी निश्चित केले होते. तसेच उर्वरीत फीचे चेक शाळेला दिले होते. पण फी अपूरी असल्याचे कारण देत शाळेने ते चेक वटवले नाहीत. ऐन परिक्षेच्या दिवशी इतर विद्यर्थ्यांसमोर फी बाकी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे करुन त्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचे पालकांना समजताच गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जाधव यांना घेऊन पालकांनी शाळेत धाव घेतली त्यावेळी सर्व प्रकार दिसून आला़ पालकांनी व गटशिक्षणाधिकारी यांनी जाब विचारूनही शाळेने फी बाकीचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांची परिक्षा घेणार नसल्याचे सांगीतले. यावेळी पालकांनी आक्रमक भुमिका घेतल्या नंतर शाळा प्रशासनाने झुकते घेत दुपारच्या सत्रात राहिलेल्या विद्यार्थ्याची परिक्षा घेतली.
गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी फी स्टक्चर शिवाय बेकायदेशीर फी वाढ करणे, ज्यादा घेण्यात आलेली रक्कम परत न करणे, प्रवेशासाठी डोनेशन घेणे, बेहिशोबी अॅक्टिव्हिटी फी घेणे, स्मार्ट बोर्ड फी दरवर्षी घेणे, जमा रक्कमेचा पालकांना खर्च हिशोब न देणे, फी अपूरी असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून व परिक्षेपासून वंचित ठेवणे, विद्यर्थ्यांवर व पालकांवर मानसिक दबाव टाकणे, एकूण प्रवेशाच्या ५० टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्याना प्रवेश देणे या नियमाचे उल्लघण करणे अशा विविध गोष्टींचा खुलासा तात्काळ करण्याचे पत्र दिले आहे. अन्यथा शाळे विरूध्द महाराष्ट्र देणगी प्रतिबंध कायदा १९९८, बाल हक्क संरक्षण कायद्या २००५, शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९, महाराष्ट्र शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा २०१३, सी.बी.एस.ई. बोर्ड सुचना व अन्य शासकीय निमानुसार कारवाई करण्यात येईल असे सांगीतले आहे. या प्रकरणी सेंट जोसेफ इंग्लिश मेडीयम स्कुलचे प्राचार्य यांना विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. आपण केवळ गटशिक्षणाधिकारी यांना बोलू असाच पवित्रा त्यांनी घेतला होता.
विष्णू कांबळे, गटशिक्षणाधिकारी, बार्शी :
स्कुलला सतत लेखी सुचना करूनही फी वाढ, बेकायदेशीर पैसे वसूल करणे, विद्यार्थ्याचा मानसिक, शारिरीक व आर्थिक छळ करण्याचे प्रकार सुरू आहेत. वारंवार सुचना करूनही शाळा व्यवस्थापण मुजोरपणे वागत असल्याने या शाळेची सी.बी.एस.ई.ची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणयात येईल.