विधानसभा निवडणुकीस बराच अवधी असताना तुळजापूर विधानसभा मतदार संघात मात्र इच्छुकांकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. शिवसेना वगळता तिन्ही प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाने निवडणुकीच्या तयारीस सुरुवात केली आहे. विशेष बाब म्हणजे विधानसभेच्या आधी लोकसभा निवडणुक होणे अपेक्षित आहे. एकीकडे लोकसभेबाबत विशेष हालचाली दिसत नसताना तुळजापूर विधानसभेसाठी मात्र अनेक इच्छुकांनी भेटीगाठी व सामाजिक उपक्रमातून शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे.
राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्यापैकी जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी सर्वात अगोदर तुळजापूर विधानसभेसाठी तयारी सुरु केली आहे. मागील महिनाभरात मात्र काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या इतर इच्छुकांनी गावपातळीवर विविध कार्यक्रम घेत मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून येत आहे. विशेषत: विदयमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी महिनाभरात मतदार संघ पिंजून काढला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीने बुथ कमिटीचे नियोजन, बुथ प्रमुखाच्या नेमणुका, कार्यकर्ता मेळावा घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. काँग्रेसच्या नळदुर्ग, सावरगाव, सिंदफळ, मंगरुळ, काटगाव, इटकळ, जळकोट यासह उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावात कार्यकर्ता मेळावा, बुथ प्रमुखांच्या नेमणुका करण्यात आल्या. यावेळी आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जि.प. सदस्य ॲड. धिरज पाटील, माजी सभापती संतोष बोबडे आदींजण मेळाव्यास उपस्थित होते.
तुळजापूर येथे दि. 5 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीला तयार लागण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास जि.प. सदस्य महेंद्र धुरगुडे, जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार, अशोक जगदाळे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाकडून इच्छुक असलेले देवानंद रोचकरी हे तुळजापूर विधानसभा मतदार संघात गावनिहाय बैठका घेणे, देवराज मित्र मंडळाच्या शाखा स्थापन करणे, तुळजापूर येथील कार्यालयात कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर तळ ठोकून आहेत. तर भाजपाकडून इच्छुक असलेले अनिल काळे हे बुथनिहाय आढावा घेण्यात मग्न आहेत.
प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या गोटातून मात्र काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. मागील निवडणुकीत पाच नंबरवर असलेल्या शिवसेनेत काही महिन्यापूर्वी जिल्हयात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पर्यायाने तालुक्यात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराबाबत अदयाप चर्चा ऐकण्यात येत नाहीत. मात्र शिवसेनेकडून उमेदवार आयात होण्याची शक्यता आहे. सर्व पक्षात इच्छुकांकडून तयारी होत असताना शिवसेनेचा वाघ मात्र शांत आहे.
एकंदरीत, मागच्या निवडणुकीत प्रचाराचा श्रीगणेशा झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या पक्षात इच्छुकांची संख्या वाढली आहे. कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र या सर्व घडामोडीत उमेदवारांना सच्चा कार्यकर्ता ओळखणे कठीण झाले आहे.
मागील सर्व निवडणुकीपेक्षा 2019 ची निवडणुक सर्वार्थाने वेगळी व सोशल मिडियाच्या वापरामुळे निर्णायक ठरणार आहे. सत्ताधारी भाजप वगळता सर्वच राजकीय पक्षांनी ईव्हीएम मशीनला विरोध दर्शवला आहे. निवडणुक आयोग मात्र ईव्हीएम मशीनच्या वापरावर ठाम आहे. वेगळेपणा म्हणजे मशीनवर उमेदवाराचा फोटो असण्याची शक्यता आहे. तसेच मतदारांना मतदान केल्याची पावतीही येत्या निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे.