आज रविवार दि. 9 सप्टेंबर रोजी कृषी संस्कृतीतील बैलपोळा हा सण साजरा करीत असताना "बळीराजा" ची आजही सांगितली जाणारी अख्यायिका व पुर्व इतिहास याबाबत तुळजापूर लाईव्हचे विशेष वृत्त..

पुराणात तिन्ही लोकांत बळीराजा हा खर्‍या अर्थाने सर्वश्रेष्ठ होता. त्याच्या कर्तृत्वाने त्याने नावलौकीक मिळविला होता. यामुळे तिन्ही लोकांना जबरदस्त हादरा बसला होता. देवाचे अस्तित्व धोक्यात आले. यातूनच भगवान महाविष्णूला वामनाचा अवतार घ्यावा लागला आणि वामनाने बळीला तीन बिगा जमीन मागून पाताळात गाडल्याचे सांगितले जाते. आजही मध्ययुगीन मोघलाई पासून शेतकर्‍यांची अवहेलना सुरूच आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात बळीराजाला थोडेफार चांगले दिवस आले. काळाच्या ओघात शिवराज्य गेले व पांढर्‍या कातड्याचे ब्रिटीश आले. त्यांनी शेतकर्‍यांना पूर्ण नागविले. या भारत भूमिचा सुजलाम-सुफलाम भुभाग पाहून इंग्रजांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांनी शेतकर्‍यांवर अन्याय, अत्याचार, जुलमी कायदे केले. नंतर भारतभुमीस स्वातंत्र्य मिळाले. परंतू बळीराजाचे दुष्टचक्र काही संपले नाही. महात्मा गांधीनी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हा मंत्र नव्या सरकारला दिला. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव संपन्न झाला तरी ‘बळीराजाचा बळी’आजही जातोयच.

जग 21 व्या शतकाकडे झेप घेत असताना भारतीय जनसंस्कृतीला शेतकर्‍यांना एक प्रकारचा शाप लागला आहे. अगदी प्राचीन काळापासून कोणतेही उदाहरण घ्या, शेतकर्‍याला कोणी ना कोणी मातीत गाडलेच आहे. आदिमानव अवस्थेत टोळ्या करून राहणार्‍या मानवास कृषी उद्योगाचा शोध लागला. त्यामुळे तो सुपीक मातीत धान्य पिकवू लागला. त्या आधाराने अवघी मानव जात स्थिर झाली. पोटाचीच खळगी भरण्यासाठी शेत निर्माण झाले. खत व घामाचे मोल देवून शेतीवर आधारित ग्रामव्यवस्था तयार झाली. त्यानंतरच्या काळात समाजात दोन गट निर्माण झाले. एक होता राबवून खाणारा, तर दूसरा होता राबणारा. राबणार्‍याला मारून त्यांचे पळवून खाणारा. राबवून खाणारा तो शेतकरी बनला आणि राबणार्‍याला मारणारा स्वत:ची तुंबडी भरून खाणारा तो राजा झाला. या मारणार्‍याने हा राबणारा कधीच सन्मानाने जगला नाही. जगवू दिला नाही. तर तो डोकेही वर काढू शकणार नाही. असे ही रझाकारी जुलूमशाही लोकशाही संघटीत बळावर निर्माण केली. बळीचं राज्य कधी काळी होतं असे भुतकाळातील वाक्य आजही ऐकायला मिळते. बळी म्हणजे स्वत:च बळ वापरुन धरतीशी इमान राखणारा आणि या धरतीतून मुबलक उत्पादन घेणारा. बळी वंशाचा बळवंत. बळीराजा म्हणजे शेतकरी. तो राजा होता. त्याच्या हाती सत्ता होती. पण ती सत्ता फार काळ टिकली नाही. या बळीच्या हाती सत्ता राहिली असती तर ऐतखाऊ खाणार्‍याचे हाल हाल झाले असते. म्हणून सगळीकडे रिकामटेकडे, बसून खाणारे फुकटे संघटीत झाले आणि या स्वातंत्र्यातही या दानशूर बळीला कटकारस्थान करून आजही पाताळात गाडू लागले.

दीनदुबळ्या गरीबांना स्वातंत्र्यात गुलाम बनविण्यात आले. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा तोडून राजकारण केले. त्याप्रमाणे शेतकर्‍याला मानसिक गुलाम बनविण्यात आले. त्यातूनच त्याची बुद्धी बोथट करण्याचे, त्याची बुद्धी प्रमाण्य वाद डोकेवर काढणार नाही याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले आणि ज्या देवाने बळीराजास मातीत गाडले त्याच देवकल्पनेच्या शस्त्राने डिवचून शेतकर्‍याला त्याच्या कुटुंबासह अंधश्रद्धेच्या दारी नेऊन उभे केले. शाहू, फुले, आंबेडकर या महापुरूषांनी कितीही समाजप्रबोधन केले तरी आजही हा राजा हातपाय खोडून खोडून तडपून मरतो आहे. आपल्या अधोगतीचे कारण लक्षात आल्यामुळे शत्रूला मोकळे सोडून स्वहाताने गळ्याभोवती फास आवळत आहे. अनेक समाजसुधारक ‘मरू नका आता मार’ असा टोह फोडून सांगत असताना यांच्या अंगात अवसान येत नाही. त्यांची ही अवस्था कशामुळे झाली. वर्षानुवर्षो  त्यांच्यावर लादल्या गेलेल्या गुलामगिरीमुळे झाली? बळी राजा कधी होणार? होणार की नाही? असे प्रश्‍न आजही त्यांच्याकडे पाहिल्यास निर्माण होतात.

अनेक राजे आले गेेले. आदिलशाहीत हीच अवस्था होती. मोघलाने फार लुटले, संघटीत आक्रमकतेच्या बळावर या देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि या जमिनीत राबणार्‍या शेतकर्‍याला मुठीत ठेवले. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय अत्याचार केले. यांनी कष्ट करायचे आणि त्याने लुटायचे. तरीही सुलतानी संकट शेतकर्‍यांवरून गेले नाही. त्यांना रोखणारा स्वराज्याचा संस्थापक निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकर्‍यांच्या श्रमाचे मोल जाणून शेतकर्‍यांना सन्मानाने जगता येईल अशी ध्येय धोरणे आपल्या राज्यात राबविले.

या आत्महत्या आज नव्या नाहीत. दररोजचेच होवून बसले आहे. बळीराजा संघटीत नसल्याने तो न्याय मागू शकत नाही. त्याचे विचार कोणी विचारू पाहात नाही. संसदेवर हल्ला करणारे अतिरेकी मेल्यावर जीवाचा आकांडतांडाव करून मानवी हक्कवाले मानवतेस काळीमा लागल्याची ठोंब ठोकल्याचे सर्वश्रूत आहे. मग शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर असा का समाज निष्ठूर झाला आहे. दिवसभर शेतात राब राबूनही शेती मालास किंमत मिळत नाही. सहकार सम्राट सहकाराच्या नावाने शेतकर्‍यास लुटतच आहेत. तसे बळीराजाच्या डोक्यावर कर्जाचा बोझा वाढतच आहे. शेतकर्‍यांने शेतात ऊस पिकवावा अथवा कापूस, नाहीतर कांदा. कोणतेही पीक घेतले तरी शेवटी त्याला जावे लागते या धन दांडग्यांच्या हाती. शेतात पिक उभे आहे, तेंव्हा व्यापारी मालाचे भाव वाढवितात आणि पीक बाजारात आल्यास धान्याचे भाव झपाट्याने खाली उतरवितात. नाविलाजाने कर्ज बाजारी झालेल्या शेतकर्‍यांसच आपली जमीन खासगी सावकाराच्या तावडीतून सोडविण्यासाठी येईल त्या दामाने विकावेच लागते. यामुळे ना त्याच्यावरचा कर्जाचा बोझा कमी होतो, ना त्याची जमीन वाचते. शेवटी बळीराजाला वैतागून आत्महत्या करावीच लागते. 21 व्या शतकात देशाचा संपर्क जगाशी आला तरी बळीराजा अद्याप तळागाळातच आहे. या शासनाच्या अर्थव्यवस्थेला काय म्हणावं? आजकाल शासन चालविणे हे गरीबांसाठी, शेतकर्‍यांसाठी नसून धनदांडग्या दलालांचे आहे हे दिसून येते. शेतकर्‍यांची अधोगती रोखण्याची ताकद शासकीय यंत्रणेत आहे पण खुल्या व्यापारी धोरणात त्याला टिकवून ठेवायचे असेल तर आत्महत्येपासुन परावृत्त करायचे असेल, तर शेतकरी कुटुंबातून आलेले, त्यांच्या समस्येची जाण असणारे नेते सत्ताधारी होणे गरजेचे आहे. आतापर्यंतचे बहुतांश सत्ताधारी ग्रामीण भागातून आलेले होते. हा युक्तीवाद खरा असला तरी त्यांनी शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करण्याऐवजी आपल्या स्वार्थासाठी शेतकरी विरोधी धोरणे राबविले हेही खरे आहे. निवडणूकीत भ्रष्ट माध्यमाचा उपयोग, पैशाचा दुरूपयोग यात खर्च झालेला पैसा वसूल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भांडवलशाहीपुढे नतमस्तक होतात. येथेच भारतीय शेतकर्‍यांची शोकांतिका झाली आहे. सत्ताधार्‍यांनी सत्तेवरून दूर गेल्यानंतर शेतकर्‍यांचा उपयोग आंदोलनासाठी केला. त्याचा शेतीविषयी कळवळा हा कायम ढोंगीपणाचा राहीला आहे. जेंव्हा यांच्या हातून सत्ता जाते तेंव्हा शेतकरी आठवतो. मात्र सत्तेवरती बसताच याकडे ते पाठ फिरवितात. यासंदर्भात शेतकर्‍यांचे विचार परावर्तीत होणे गरजेचे आहे.

आजचा शेतकरी संघटीत नसल्याने त्यांच्या समस्या जगापुढे येत नाहीत. त्यामुळे त्याला न्याय मिळत नाही. जर संघटीत झालाच तर हे राज्यकर्ते त्यांच्या संघटीतपणांवर घाव घालतात. कारण शेतकर्‍यांनी संघटीत होवू नये यातच त्यांचे हित आहे. जर शेतकरी संघटीत झाला तर त्याने उत्पादीत केलेल्या शेतीमालाला तो स्वत: भाव मिळवून घेऊ शकतो. त्याने जर सहकाराकडे पाठ फिरवली तर राज्यकर्त्यांच्या चुली बंद पडतात. फक्त बळीराजाने आत्महत्या न करता संघटीत व्हावे. संघटीत शक्तीच्या जोरावरच इतिहास घडविता येतो हे त्याने जाणावे. एवढेच याप्रसंगी नमुद करावेसे वाटते.

 
Top