बोरगांव दे : अमोल फुलारी 

अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव (दे) कर्नाटक व मराठवाडा सीमेवर असलेले पाच हजार लोकवस्ती असेलेले गाव. बोरगांव गावानेच मोहरमच्या निमित्ताने हिंदू- मुस्लिम ऐक्य घडवून जनतेसमोर आदर्श निर्माण केला. दिमाखदार मोहरम सोहळा साजरे करण्यासाठी बोरगाव हे गाव सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध आहे. यावेळी  ऐक्याचा अतुट व नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी बोरगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तिभावाने उपस्थित होते. 


मोहरम हा सण मुस्लिमांचा उत्सव आहे पण बोरगाव गावात मात्र सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव गुण्यागोविंदाने व निस्सीम भक्तिभावाने साजरा करतात. संबंध विश्वात धार्मिक कट्टरतावाद पराकोटीला गेला असताना बोरगावचा मोहरम सोहळा धार्मिक कट्टरता बाळगणाऱ्यांना सणसणीत चपराक आहे .धर्मांधतेचा उच्छाद मंडणार्यांनी हा सोहळा पहावा . हिंदू आणि मुस्लिम यांचा दोन्ही धर्मातील सलोखा आचरणात आणण्यासारखा आहे . बोरगाव येथे मोहरम मध्ये पाच दिवसाचे पंजे बसतात .नित्यनियमाने गावातील सर्व जाती धर्माचे लोक  दररोज देवास ऊद घालून नैवेद्य दाखवतात. गावातील मुख्य प्रवेश द्वारावर असलेले वेस येथे नाले हैदरी हुसेन बाशा व बारा इमाम  यांचे पंजे बसतात तर पेठेत  ,इमाम खासीम व अली अब्बास व हुसेन बाशा यांचे पंजे बसतात त्याच बरोबर याचे सुंदर ताबूत ( डोली) ही असतात .पंजे बसल्यापासून तिसऱ्या दिवशी सायंकाळी दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत लहान कत्तल  हा उत्सव होतो या दरम्यान पठाण गल्ली, लोहार गल्ली , तसेवाली गल्ली, मुजावर गल्ली, वडार गल्ली , गणपती गल्ली, इंदिरा नगर गल्ली यांचे हलगी , शहनाई व झांजच्या तालात दिमाखदार मेळ निघतात व हे मेळ संपूर्ण गावात नाचत प्रदक्षिणा घालतात व त्या नंतर पाचव्या दिवशी म्हणजे बडा कत्तल रोजी असेच मेल निघतात व पहाटे चार वाजता पंज्यात सवारी भरते व प्रदक्षिणा घालतात त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता अंगाला पिवळे रंग लावून त्यात वेगवेगळ्या रंगाचे पट्टे ओढून वाघाची रूपरेखा साकार करून संपूर्ण गावात वाघ खेळत जातात . यामध्ये अनेक गल्लीचे वाघ सामील होतात. यासोबत सोंग म्हणून चित्रविचित्र कपडे घालून सोंग काढतात तदनंतर गावातून धुला खेळतात व त्यानंतर चार वाजता सर्व पंज्यात कडक सवारी भरते व पंजे घेऊन नाचत गावातून प्रदक्षिणा घालतात व उत्सवाचा समारोप ( विसर्जन ) गावच्या शेजारून वाहणाऱ्या ओढ्यात केला जातो . व मोहरम संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी जारत म्हणून चुरमुरे, लाडू, फुटाणे ,भात ,केळी व गोड सरबत वाटतात. बोरगावात अखंडतेचा  व समतेचा संदेश देणारे मोहरम उत्सव जल्लोषात साजरे झाले. 

आकर्षक सोंग व नृत्य व गायन 

मोहरम उत्सव सुरू झाल्या पासून तिसऱ्या दिवशी व पाचव्या दिवशी रात्री दोन वाजता हिंदी , मराठी व कन्नड भाषेत  रिवाईत गायले जाते . व शेवटच्या दिवशी मोहरम उत्सवात बैरागी, भाट व करबल सोंग काढतात.  चित्रविचित्र कपडे घालून अंगाला तोंडाला रंग लावून सोंग काढतात  व आगळे वेगळे नृत्य करतात 

 
Top