अक्कलकोट : रियाज सय्यद
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसह तरूणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून पुरुष व महिला पोलिसांचे निर्भया पथक सज्ज असून निर्भया पथकांमुळे महिलांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशन चे उपनिरीक्षक सोनाली गोडबोले - पाटील यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित मातोश्री नीलव्वाबाई खेडगी शिशु-प्राथमिक - माध्यमिक प्रशाला व सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण अंतर्गत अक्कलकोट विभाग निर्भया पथक च्या वतीने आयोजित महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना सोनाली गोडबोले - पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी हे होते. यावेळी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेच्या संचालिका पवित्रा खेडगी, सुभद्रा साठे, डॉ. आसावरी पेडगांवकर, उपनिरीक्षक संजय मोतेकर, कॉन्स्टेबल हसन पिरजादे, वैभव सूर्यवंशी, आनंद कुंभार, वसुधा माळी, नागम्मा पुजारी, प्राचार्या विश्वजा दर्यापूरकर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी भुसूनगी, उपमुख्याध्यापिका मेघा कलशेट्टी उपस्थित होते.
उपनिरीक्षक सोनाली गोडबोले - पाटील पुढे म्हणाल्या कि, शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार घडत असतात. यातून शारीरिक शोषणाचे गुन्हे घडतात. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी, एस. टी. बसस्थानक, प्रवासातही या विद्यार्थीनींना तरूणी व महिलांना छेडछाड आदी अनुभव येत असतात. नोकरी, कामाच्याठिकाणीही अशा प्रसंगांना त्यांना तोंड द्यावे लागते. घरगुती वादातून महिलांवरील होणारे अत्याचारही वाढीस लागलेले आहेत. अशा घटनांवर पायबंद घालण्यासाठी महिलांची सुरक्षितता व त्यांना तातडीने पोलीस मदत मिळावी म्हणून पोलिसांची निर्भया पथके स्थापन केली आहेत. या पथकासाठी स्वतंत्र वाहन दिलेले आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाणी हे पथक दिवस- रात्र करडी नजर ठेऊन संबधीतांवर कारवाई केली जात आहे. या पथकासोबत पुरुष पोलीस आहे. पथक २४ तास सक्रिय असेल आणि विद्यार्थीनी, तरुणी, महिलांच्या तक्रारी आल्यास तातडीने घटनास्थळी पोहचून मदत केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेट्या व त्यातील तक्रारी हे पथक हाताळणार आहे.जेणेकरुन अडचणीच्यावेळी पोलिसांची तातडीची मदत मिळेल असे गोडबोले - पाटील यांनी सांगितले.महिलांना स्वातंत्र्य, सुरक्षितता व भयमुक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे सांगितले.
नगराध्यक्षा शोभा खेडगी म्हणाले, महिलांना स्वातंत्र्य, सुरक्षितता व भयमुक्त करणे हे पोलिसाचे कर्तव्य आहे. महिलांना सहानुभूती नको तर समानुभूती हवी आहे. स्वयंसिद्ध महिला तयार करणे ही आजची गरज आहे. या पथकाद्वारे महिलांना निश्चितपणे न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केले.
तसेच यावेळी संजय मोतेकर यांचे वाहतूक नियमन व व्यसनमुक्ती व डॉ. पेडगावकर यांचे सदृढ आरोग्यासाठी संतुलित आहाराचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्राचार्या विश्वजा दर्यापूरकर यांनी केले. सूत्रसंचालन शुभांगी दंडनाईक यांनी केले तर स्वाती सलगरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास मराठी व इंग्लिश माध्यमातील शिक्षिका, कर्मचारी वर्ग व विद्यार्थिनी उपस्थित होते.
