काटी :- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील प्रगतशील शेतकरी विद्यमान सरपंच आदेश कोळी यांनी बैल पोळ्यानिमित्त परतीच्या पाऊसाने ओड दिल्याने बळीराजावर दुष्काळाचे सावट असूनही आपल्या शेतात वर्षभर राहणाऱ्या सर्जा-राजाची गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून बैल पोळा सण साजरा केला.
परतीच्या पाऊसाने ओड दिल्याने शेतातील उभी पिके सुकू लागली आहेत. परिसरातील नदी, साठवण तलाव, पाझर तलाव, विहिरींना पाणी वाढले नसल्याने भविष्यात जनावरांचा चार्याचा प्रश्न भेडसावणार असल्याचे चिन्ह दिसत असले तरी शेतात वर्षभर राहणाऱ्या आपल्या शेतातील सर्जा-राजाच्या महत्वाच्या सणाला पाठ फिरवून कसे चालेल या भावनेतून दुष्काळाचे सावट असूनही सरपंच आदेश कोळी व भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अविनाश कोळी यांनी पोळा सण साजरा केला. मिरवणुकीनंतर कोळी बंधूंनी आपल्या दारासमोर सर्जा-राजाला उभे करुन वडील जालिंदर कोळी यांच्या हस्ते बैलजोडीचे पुजन करुन त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला.
गावातील शेतकऱ्यांनी पोळ्यानिमित्त सजलेल्या पोळा साहित्याच्या दुकानाकडे यंदा पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले.
मंगरुळ मध्ये पोळा सण उत्साहात साजरा
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथेही बैल पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. येथील काही शेतकर्यानी परतीच्या पाऊसाने ओढ दिल्याने बैलजोडीला लागणाऱ्या किरकोळ वस्तूची खरेदी करीत बैल पोळा सण साजरा केला. येथील शेतकरी तथा पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे व अजिंक्य सरडे यांनी हलगी,बॅन्ड पथकासह बैलजोडीची मिरवणूक काढून दारासमोर सर्जा-राजाची पं.स.सदस्य चित्तरंजन सरडे यांच्या हस्ते पुजन करुन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.