मुरुम :
उमरगा तालुक्यातील मुरूम पोलीस ठाणे हद्दीतील भोसगा तसेच उमरगा पोलीस ठाणे हद्दीतील कवठा येथे अनोळखी मृतदेह आढळून आले होते.दोन्ही मृतदेहांची ओळख पटवत या खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुरूम पोलिसांनी कांही जणांकडे सखोल चौकशी सुरू केली होती. अखेर आरोही आणि सिमाच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून या दुहेरी खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील भोसगा पाटी येथे दि 12 रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता.तसेच उमरगा तालुक्यातील कवठा पाटी येथे दि 11 रोजी एका अनोळखी चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता.या दोन्ही मृतदेहाची ओळख पटवण्यात मुरूम पोलिसांना यश मिळाले होते.तसेच हे दोन्ही मृतदेह मायलेकींचे असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले होते.या दुहेरी खून प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाचा छडा लावायचाच याची मनोमन खूण गाठ बांधत मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्थफा शेख यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास लावण्यात यश मिळवले आहे.या प्रकरणी पोलिसांनी सिमाच्या पूर्व पतीसह कांही जणांना संशयातून ताब्यात घेतले होते.तसेच या प्रकरणी उमरगा येथे देहविक्री व्यवसाय करणाऱ्या सपना नावाच्या आंटीसही पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी सुरू केली होती.सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करणाऱ्या आंटी ने खुनाची कबुली दिली.अखेर या दुहेरी खून प्रकरणाचा छडा लावण्यात मुरूम पोलिसांना यश आले असून आरोही आणि सिमाच्या खून प्रकरणी मुरूम पोलिसांनी सपना नामक आंटी तसेच तिच्या मुलास ताब्यात घेतले आहे.
