शिवाजी नाईक
तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले आहे. सर्वत्र कुर्डू गवताची वाढ झाली आहे.तर खरीप पिके व पाचशे एकरपेक्षा आधिक द्राक्षे बागाचे नुकसान झाले आहे.खरीप गेले तर रब्बी हंगामाची वाट लागत आहे. हाता तोडांशी आलेला घास हिरावून न्यावा तशीच काहीशी अवस्था शेतक-यांची झाली आहे. दरम्यान शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतक-यांतुन मागणी आहे.
तुळजापूर तालुक्यात सोयाबीनची 71 हजार 168 हेक्टर पेरणी झाली असुन तालुक्यात 1 हजार हेक्टर द्राक्ष बागा असलयाचे कृषी आधिकारी जी.बी.शेख यानी दिली.यावर्षी पुर्व मोसमी पाऊस म्हणावा तसा झाला नाही. तर पाऊस वेळेवर न झाल्याने पेरण्या लांबल्या. कसेबसे खरीप पिके आले. मात्र दोन आठवडयापासुन पाऊस सुरू असुन नोव्हेंबर उजाडला तरी यावर्षी पावसाळा सुरूच आहे. पाऊस थांबणार तरी कधी असा प्रश्न तुळजापूर तालुक्यातील शेतक-यांना पडला आहे. खरीपातील पिके व फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरवर्षी शेतकरी रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतीची मशागत करून आक्मटोबरध्ये पेरणी करतो. मात्र यावर्षी शेतात साचलेले पाणी,कुर्डसारखे गवत व तण वाढल्याचे पाहून शेतकरी हतबल झाला आहे. शासकीय भरीव आर्थिक मदत मिळण्याची शेतक-यातुन मागणी होत आहे.
परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांची पिके पूर्णतः पाण्यात आहेत. या अतिवृष्टीचा सर्वच पिकाना बसला असून, सध्या द्राक्षबाग बहरात असताना, पावसामुळे अतिरिक्त पाणी होऊन, द्राक्ष बागांवर डाऊणी व घडकुजमुळे द्राक्षांचे घड उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे द्राक्ष बागायतदार हैराण झाले आहेत.उन्हाळयात द्राक्ष बाग जगविण्यासाठी प्रचंड मेहनत शेतकऱ्यांनी घेतली आहे. परंतु ही मेहनत या रोगामुळे पाण्यात गेली आहे.जळकोट व नळदुर्ग, सावरगाव मंडलातील बहुतांशा द्राक्ष बागा रोगग्रस्त झाल्याचे दिसुन येत आहे.त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादनावर प्रचंड परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.
तुळजापूर तालुक्यात पावासाची सरासरी 837मि.मी असुन आज अखेर पर्यंत 900मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मंडलनिहाय झालेला पाऊस पुढीप्रमाणे आहे.
तुळजापूर 882 मि.मी,मंगरूळ 719 मि.मी,सावरगांव 888 मि.मी,नळदुर्ग 905 मि.मी,जळकोट 847 मि.मी,सलगरा दिवटी 1105 मि.मी, ईटकळ 866 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.गतवर्षी तालुक्यात 520.26 मि.मी एवढा पाऊस झाला होता.
संतोष बोबडे, द्राक्ष बागायतदार , सावरगाव ता.तुळजापूर
माझी 24 एकर द्राक्ष बाग आहे. सावरगाव व तुळजापूर मंडलात जवळपास पाचशे एकर द्राक्षबागा आहेत. बागेची ऑक्टोबरमध्ये छाटणी करावी लागते.मात्र सततच्या पावसामुळे छाटणी करता आली नाही.ज्यानी बागेची छाटणी केली,पावसामुळे त्याच्या द्राक्षेचे घड गळुन पडले आहे.
सौदागर तांदळे, तहसिलदार ,तुळजापूर
तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतातील पिकाचे पंचनामा कृषी साहय्यक , तलाठी,ग्रामसेवक यांच्याकरवी सरसकट शुक्रवार दि.१ नोव्हेंबर रोजी सकाळ पासुन सुरु केले आहे. शेतीचे विमा भरलेल्याना व न भरलेल्या पण नुकसानग्रस्त शेतक-याना लाभ मिळणार आहे. हे पंचनामे तीन दिवसात करणार आहे.