काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी परिसरात सोमवारी रात्री 12 नंतर अचानक मोठ्या विजेच्या गडगडाटासह व वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांचा जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. या पावसात विजेचा लखलखाटामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले. तर रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अबालवृद्धासह लहान मुलांचे उखडून मोठे हाल झाले.
काटी परिसरात शेतक-याच्या द्राक्षांच्या बागेसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. तर रामेश्वर गवंदारे यांची लिंबोनीची झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले तसेच प्रताप ढगे यांच्या गट नं 345 मधील, गोवर्धन भानुदास बनसोडे यांच्या 227 मधील, महालिंग तात्या घाणे यांच्या गट नं 253 मधील, दशरथ तुकाराम काळे यांच्या गट नं 233 मधील पत्र्याचे शेड उडून मोठे नुकसान झाले तर गोवर्धन बनसोडे यांचे मोठे आंब्याचे झाड उन्मळून पडले. तसेच वाणेवाडी येथील स्वप्निल गैबी मिरजे यांच्या गट नं. 24 मध्ये बांधलेल्या गायीवर वीज पडून गाय जागेवरच ठार झाली. काटी सज्जाचे तलाठी प्रशांत गुळवे यांनी प्रत्येक्ष घटनास्थळी जाऊन मृत गायीचा पंचनामा केला.
कृषी विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी केली आहे.