उस्मानाबाद :-  उस्मानाबाद जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लॉकडाऊन काळात प्रशिक्षणार्थ्यांच्या नियमित प्रशिक्षणात अडथळा निर्माण झालेला आहे. सर्व सद्यपरिस्थितीचा सखोल अभ्यास करून १५ मेपर्यंतचा अभ्यासक्रम ऑनलाइन घेण्याचे सहसंचालक, एस आर सूर्यवंशी औरंगाबाद यांनी सर्व संस्थांना सूचित केले आहे.

     कोरोना संसर्ग वाढू नये तसेच त्यांचा सामुदायिक प्रसार होऊ नये म्हणून शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. औद्योगिक  प्रशिक्षण संस्था हे देशाच्या औद्योगिक बांधणीचे प्रमुख मनुष्यबळ पुरवठा चे स्रोत असून यांच्या माध्यमातून औदयोगिक क्षेत्रात पारंगत मनुष्यबळाचा पुरवठा होत असतो. सर्व औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत शासकीय सुट्टी वगळता एक वर्ष मुदतीत किंवा दोन वर्षे मुदतीच्या व्यवसायात पूर्णवेळ थेरी, प्रात्यक्षिक, कार्यशाळा गणना, अभियांत्रिकी आरेखन, रोजगार कौशल्ये इत्यादी विषयांचे मागणीनुसार आधुनिक प्रशिक्षण दिले जाते. परंतु कोरोना रोगाच्या जागतिक महामारीचे सर्वच क्षेत्रात थैमान घातल्यामुळे शैक्षणिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था लॉकडाऊन मुळे  टाळेबंद आहेत. त्यामुळे नियमित चालू असलेल्या प्रशिक्षणात खंड पडल्यामुळे आता प्रशिक्षण द्यायचे कसे हा प्रश्न निदेशकांसमोर आणि घ्यायचे कसे हा प्रश्न प्रशिक्षणर्थ्यांना भेडसावत होता. याचा तोडगा जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गातून काढण्यात आला आहे.


समाज माध्यामाचा प्रभावी वापर

 जिल्ह्यातील सर्व आयटीआयमध्ये व्यवसायनिहाय व्हाट्सएप ग्रुप बनविण्यात आले. त्यावर प्रशिक्षणाच्या सूचना, प्रश्नसंच, नोट्स इत्यादी सामग्री पाठवण्यात येऊ लागली. त्यानंतर त्यांच्याकडून पाठवलेले प्रश्न असायनमेंट वहीत वेळेत सोडवून घेण्यातही येऊ लागले. तरीही मुलांची कन्सेप्ट क्लिअर होताना दिसत नव्हती. यावर पर्याय म्हणून झूम मिटिंग अँपद्वारे सर्व प्रशिक्षणर्थ्याच्या व्यवसायनिहाय निदेशक ऑनलाइन लेक्चर घेऊ लागले. यात विद्यार्थ्यापर्यंत आपल्या निदेशकांचे मार्गदर्शन थेट पोहचू लागल्याने सर्व प्रकारच्या अडचणी प्रशिक्षणार्थी लेक्चरमध्ये सोडवून घेऊ लागले. तसेच रोज मागच्या दिवसाचे कोणत्या निदेशकाने काय शिकवले याचा प्रगती अहवाल निदेशक ग्रुप वर प्रसिद्ध केला जातो.    

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचलनालय मुंबई यांच्याकडून जिल्ह्यातील रॉकस्टार निदेशकांनी बनवलेले व्हिडीओ लेक्चर मागविण्यात आले. जेणेकरून या लेक्चरचा फक्त जिल्ह्याला उपयोग न होता संपूर्ण राज्यातील प्रशिक्षणार्थी लॉकडाऊन काळात संबंधित व्यवसायच्या टॉपिकचा अभ्यास घरबसल्या करू शकतील.

उस्मानाबाद पॅटर्ण 

उस्मानाबाद आय.टी.आय. चे युट्यूब चॅनल आहे. या वर सर्व उपक्रमाचे व्हिडीओ व अभ्यासक्रम उपयुक्त व्हिडीओ सतत अपलोड केले जातात . राज्यांत आय .टी. आय. स्तरावर फक्त उस्मानाबाद आय.टी.आय. चे असे युट्यूब चॅनल आहे. युवकांचे युट्यूब आकर्षण लक्षात घेऊन हे माध्यम शिक्षणा साठी वापरले जात आहे.

उस्मानाबाद आयटीआयमधील अतिष सुरवसे यांचे डीटीपीओ या व्यवसायाचे १९ व्हिडिओ, मनोज चौधरी यांचे जोडारी वरिष्ठ व्यवसायाचे ०३ व्हिडीओ, डी आर वाघमारे यांचे ०२ व्हिडीओ, कळंब आयटीआयमधील धैर्यशील मडके यांच्या जोडारी कनिष्ठ व्यवसायाचे १० व्हिडीओ असे ३४ व्हिडीओ अद्यापपर्यंत DVET E Learning  या राज्यपातळीवरच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहेत. यांच्या सर्व लेक्चरव्हिडीओना चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर अतिष सुरवसे यांनी बनविलेल्या भारत स्किल या व्हिडिओला आतापर्यंत २२००० च्या जवळपास प्रशिक्षणार्थी यांनी पाहिला असून अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

    ऑनलाइन झुम मिटिंग अँप, व्हाट्सअप्प, डिव्हीइटी इ लर्निंग युट्यूब चॅनेलवर शिकवलेल्या सर्व घटकावर ऑनलाइन गुगल फॉर्मच्या स्वरूपात आजवर १०० प्रश्नसंच तयार करण्यात आलेले आहेत. पाठ संपल्यानंतर प्रत्येक मुलांकडून हे प्रश्न सोडवून घेतले जात असून त्यांना मिळालेल्या मार्कवरून त्यांचे मूल्यांकन ही वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून केले जात आहे.

मुलीं ची मास्क निर्मिती

याचबरोबर उस्मानाबाद आयटीआयच्या ड्रेस मेकिंग शिल्पनिदेशिका सौ ए एल निर्मळ यांनी गरजूंना ५०० मास्क तयार केले व वाटप केले. त्यांचे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील मुली आहेत त्यांनीही मास्क तयार करून घरातील सदस्य , नातेवाईक , गावातील लोकांना वाटण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यात नक्कीच यश मिळेल असे मत यांनी यावेळी व्यक्त केले.

    जिल्ह्यात चाललेल्या सर्व ऑनलाइन प्रशिक्षणाचा आढावा जिल्हा व्यवसाय अधिकारी रवीशंकर सावळे हे टीम उस्मानाबाद या गृप च्या माध्यमातून दररोज घेतात . या साठी दिवसभरात कोणते शिक्षण दिले हे ऐका खास जिल्हासाठी तयार केलेल्या गुगल फॅार्म मध्ये माहीती शिक्षक भरतात . जिल्ह्यातील सर्व ग.नि. यांचे यांवर देखरेख असते.

तसेच प्रत्येक आयटीआयचे प्राचार्य झुम व्हीसीद्वारे घेत असून शासनाच्या मिळणाऱ्या सूचना सर्व कर्मचार्यांपर्यंत पोहचवत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणार्थीचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान लॉकडाऊन काळात होऊ नये याबाबत सर्वांकडून दक्षता घेतली जात आहे.

सांघिक कामा मुळे यश - रविशंकर सावळे

या बाबत उस्मानाबाद जिल्हयाचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविशंकर सावळे यांनी सांगितले की, “या उस्मानाबाद जिल्ह्यातील आय.टी.आय. ऑनलाईन शिक्षण उपक्रमांची  कौतुक राज्य भरातून होत आहे. व उस्मानाबाद चा “टीम उस्मानाबाद पॅटर्ण" नावाने चर्चेत आहे. त्याचे अनुकरण ईतर जिल्हयात  केले जात आहे. १३ अधिकारीं पदे मंजूर असूनही केवळ चार अधिकारी जिल्हयात कार्यरत आहेत. त्यांच्या व सर्व कर्मचारी यांच्या सांघिक  व नियोजन बद्द कामा मुळे हे यश मिळाले असून . जिल्हा सर्वच याजनांच्या अंमलबजावणी बाबतीत गेल्या दोन वर्षा पासून आघाडीवर आहे”
 
Top