काटी : उमाजी गायकवाड
कोरोनोच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास नोकरी करत आपल्या घरच्या लोकांचा विचार न करता दुसऱ्यांच्या प्राणाचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असलेल्या पोलिसांचा तुळजापुर तालुक्यातील सुरतगाव येथे गावातील महिलांनी औक्षण करून सन्मान केला.
कोरोना या जिवघेण्या विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे.अनेक देशामध्ये दररोज लाखो लोकांना या आजाराची लागण होत असुन हजारांच्या पटीत लोकांचे मृत्यू होत आहेत.भारत देशातही हजारो लोकांना लागण झाली असुन शेकडो लोकांचा मृत्यू झाला. या विषाणूच्या बचावासाठी देशामध्ये लाॅकडाऊन सुरू आहे. केंद्र,राज्य सरकार, पोलिस प्रशासनाच्या वतीने कोणालाही घराबाहेर न पडण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या लाॅकडाऊनमध्ये रस्त्यावर उभे आहेत ते आपले रक्षणकर्ते पोलीसच आपल्या कुटुंब,स्वकीयांपासुन दुर राहुन त्यांची पर्वा न करता रात्रंदिवस चोवीस तास ते जनतेच्या जिवाची काळजी घेताना दिसत आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रशासनाबरोबर पोलिसांचीही लढाई सुरू आहे. हेच पोलीस रस्त्यारस्त्यावर, खेड्यापात उन्हामध्ये आपल्या जीवाची काळजी न करता जनतेच्या जीवासाठी आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत. आपल्या जिवाची काळजी न करता जनतेला वाचवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्या पोलिसांचा तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील महीलांनी सुरक्षित अंतर ठेवून व मास्कचा वापर करत पुष्पवृष्टी करून व औक्षण करून सन्मान केला.यावेळी कोणीही घराबाहेर पडु नये, प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून पोलिस प्रशासनास सर्वानी सहकार्य करावे आपण नक्कीच कोरोनावर मात करून ही लढाई जिंकणार आहोत असे पोलिसांनी बोलताना सांगितले.