उस्मानाबाद दि. 01 :- महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020 प्रसिध्द केले असून यातील नियम क्र.3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्ववलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहेत.

दि.14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाऊनचे आदेश भारत सरकारने पारित केलेले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर सूचना दिलेल्या आहेत.

जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयामध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालये, पिण्याचे पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन करणाऱ्या आस्थापना, सर्व बँका, दूरध्वनी व इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या आस्थापना, अन्न, भाजीपाला, दूध व किराणा पुरविणाऱ्या आस्थापना, दवाखाने, वैद्यकीय केंद्र व औषधी दुकाने, विद्युत पुरवठा, ऑईल व पेट्रोलियम व ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे, मिडीया आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आय.टी. आस्थापना व दुकाने वगळून उस्मानाबाद जिल्हयातील सर्व आस्थापना व दुकाने दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  पोलीस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा प्रशासन अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सर्व मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत, तलाठी इत्यादींची असेल.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना आपत्ती व्यवस्थापना अधिनियम 2005 चे कलम 51 तसेच महाराष्ट्र कोविड-19 उपायोजना नियम-2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

 
Top