उस्मानाबाद दि. 01 :- जिल्ह्यातील नागरिक विशेषत: बाहेरील जिल्ह्यातून आलेले नागरिक यांना सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, घसा खवखवणे यासारखी लक्षणे जाणवल्यास त्यांनी त्वरीत नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्रात, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जाऊन तपासणी व उपचार करुन घेतले पाहिजेत. कोणतेही घरगुती उपचार करण्यात विलंब करु नये.
बाहेरुन आलेल्या ज्या नागरिकांच्या हातावर Home Quarantine (घरातच विलगीकरण) चा stamp अथवा निर्देश दिले आहेत, त्यांनी 14 दिवस घरातच थांबणे अनिवार्य आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघता कामा नये.
नागरिकांनी खोकतांना, शिंकतांना हात रुमालाचा, टिश्यूचा वापर करणे, वारंवार साबणाने हात धुणे, ताप, सर्दी, खोकला असलेल्या व्यक्ती किंवा इतरांपासून किमान एक मीटरचे अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करावे.
नागरिकांनी वरील निर्देशांचे पालन करुन स्वत:ला व इतरांना कोरोना विषाणूपासून दूर ठेवावे. घाबरु नये, परंतु वरील बाबतीत जागरुक राहून दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
