काटी : उमाजी गायकवाड 

सध्या देशात कोविड-19 ह्या साथीच्या रोगाने थैमान घातले असून देश आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीतून जात आहे.शहरी व ग्रामीण या दोन्ही भागातील उद्योगधंदे व व्यवसाय,रोजगार यांचे अर्थचक्र थांबलेले आहे.दिवसेंदिवस ह्या रोगाची साथ वाढत असल्याने आगामी काही महिने लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.देशाला या दुर्दशेतून सावरण्यासाठी अनेक कंपन्या,उद्योजक व स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी यथाशक्ति मदत केली आहे व करत आहेत.

शासनावर ज्या-ज्या वेळी असे प्रसंग आलेत,त्या-त्या वेळी शिक्षकांनी आपले योगदान दिले आहे.सध्याची परिस्थिती विचारात घेता ग्रामीण भागातील निराधार व्यक्तींना सामाजिक जाणिवेतून शक्य तितका आधार देता येतो का? या विचारातून तुळजापूर तालुक्याचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.अर्जुन जाधव यांच्या संकल्पनेतून *एक हात मदतीचा* उपक्रमांतर्गत जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणारे 'कोरोना मदत कीट' वाटप करण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले.या आवाहनाला लागलीच प्रतिसाद देत काटी व सुरतगाव ह्या दोन केंद्रातील शिक्षकांनी दोन दिवसात मदतनिधी जमा करीत जीवनावश्यक किराणा वस्तूंचे कीट तयार केल्या.तयार केलेल्या या कीट पैकी ७ कीट केमवाडी गावातील गरजू यमुनाबाई जाधव,गुलमत शेख ,शंकर माळी,राहीबाई कोकरे,नारायण महामुनी ,द्रोपदी डोलारे,सुमन परांडकर यांना वाटप करण्यात आल्या. 
   
 सदरील कीट वितरणाचा कार्यक्रम ग्रामस्तरीय कोरोना कक्ष केमवाडी  येथे पार पडला.यावेळी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत काळे सर, सौ छाया मारुती डोलारे सरपंच केमवाडी, सर्जेराव पाटील, (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ) राजेंद्र डोलारे, वैभव माळी, अमोल फंड, विष्णू ताटे आदि उपस्थित होते.


 
Top