काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शनिवार दि. (11) रोजी सकाळी येथील महात्मा तरुण मंडळ आणि सावता परिषदेच्या माध्यमातून सावता परिषदेचे जिल्हा युवा अध्यक्ष बाळासाहेब भाले यांनी स्वखर्चातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 193 व्या जयंतीचे औचित्य साधून कोरोना सहाय्यता कक्षा समोर नागरी सुविधेसाठी गावातील पाच गरीब कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर प्रवेशद्वार सुरू करण्यात आले.
प्रारंभी सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
एकीकडे शासनस्तरावरून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून काटी ग्रामपंचायतीच्या वतीनेही अनेक पावले उचलून प्रयत्न केला जात असताना सामाजिक कार्यकर्तेही पुढे येत आहेत. येथील सावता परिषदेचे जिल्हा युवा अध्यक्ष तथा ग्रा.प. सदस्य बाळासाहेब भाले यांनी स्वखर्चातून सुरू करण्यात आलेल्या मंंडप प्रवेशद्वारात गावात येणाऱ्या प्रत्येकाचे सॅनिटायझरने फवारणी करून निर्जंतुकीकरण करूनच प्रवेश दिला जात आहे. काटीसह परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या संसर्गापेक्षा भितीनेच नागरिक गर्भगळीत झाले आहेत. येथील कोरोना सहाय्यता कक्षाच्या वतीने मास्क घालने, रुमाल घालने, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुती हात रुमाल वापरणे या संदर्भात सुचना केल्या जात असून गावात प्रवेश देताना नाव ,गाव, मोबाईल नंबर, कामाचे स्वरूप आदी बाबी रजिस्टरमध्ये नोंदवून त्यांना सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करून प्रवेश देण्यात येत आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे म्हणाले की, यापुढे शेतकऱ्यांनी शेतात सकाळी 8 ते 11 या कालावधीत जावे आणि परत गावाकडे सायंकाळी
5 ते 7 या कालावधीत यावे अशी विनंती केली आणि नागरिकांनी शक्यतो घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याच प्रमाणे एकीकडे संबंध महाराष्ट्र प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सतर्क झाली असताना ग्रामीण भागातील सावता परिषदेचे जिल्हा युवा अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब भाले यांनी स्वखर्चातून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सॅनिटायझर फवारणी प्रवेशद्वार उभा करून त्या माध्यमातून नागरिकांना निर्जंतुकीकरण करुन प्रवेश दिला जात असल्याबद्दल आणि गरजू पाच गरीब कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, ग्रामविकास अधिकारी लक्ष्मीकांत सुरवसे,प्रदीप साळुंके, बाळासाहेब भाले, मकरंद देशमुख, जितेंद्र गुंड, नवनाथ सुरडकर, मोहन हागरे, दादासाहेब माळी,विशाल साळुंखे,भैय्या हजारे, कोरोना सहाय्यता कक्षातील सदस्य उपस्थित होते.
