काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि.(27) पासून येथील माजी सैनिक श्रीकांत सौदागर गाटे, इजदानी बेग, संतोष थिटे हे तीन माजी सैनिक काटी ग्रामपंचायत आणि पोलीसांच्या मदतीसाठी कोरोना विषाणू विरोधी लढाईमध्ये 'कोरोना वॉरियर्स' च्या रुपात रस्त्यावर उतरले आहेत.
काटी येथील या तीन माजी सैनिकांनी मातृभूमीची सेवा जवळपास 20 ते 25 वर्ष पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या बालवयापासूनच देशसेवेची आवड असणारे हे तरुण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आणि येथील ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनावर मनुष्यबळाचा भार येत असल्याचे लक्षात आल्याने त्यांना या कामात मदत करणे ही सुद्धा देशसेवाच आहे. या भावनेतून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी पुढे आले असून बाहेरून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवून आहेत.त्यामुळे आता कोरोना सहाय्यता कक्ष व पोलिसांच्या दराऱ्याला या माजी सैनिकांच्या शिस्तीची साथ मिळणार आहे. साहजिकच कोरोना सहाय्यता कक्षाला आता पोलीस पाटलांसह पोलिसांचा खाकी आणि माजी सैनिकांचा चित्ता ड्रेसची साथ लाभणार असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी चांगलीच जरब राहणार आहे.लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचे देशातील योगदान पाहता काटीतील हे तीन माजी सैनिक देशसेवेसाठी विनामानधन "कोरोना वॉरियर्स"च्या रुपात उतरली असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.काटी ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच माजी सैनिकांना कोरोना वॉरियर्सचे ओळखपत्र देण्यात आले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, पोलीस पाटील जामुवंत ढगे, संजय महापुरे, अनिल बनसोडे, विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.