काटी : उमाजी गायकवाड

कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी शहरातील गावाकडे येणारी गर्दी बघून तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सरपंच आदेश कोळी यांच्यासह विष्णू ढगे, राजेंद्र गाटे, गणपती चिवरे यांच्यासह जवळपास पंन्नास कुटूंबियांनी कोरोनाची धास्तीने अबालवृद्धांसह आपले सर्व बिऱ्हाड गाव सोडून शेताकडे जाऊन राहत आहेत. 

कोरोना  रोगामुळे देशात आणि राज्यात रोजच्या रोज वाढता आकडा बघून शासनाने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. ग्रामीण भागातील जनता या कोरोना धास्तीने घाबरून गेल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागातील अनेक युवक, नागरिक पुणे, मुंबई, औरंगाबाद शहरात कामासाठी, व्यवसासाठी गेले होते. कोरोनाच्या भितीने आपल्या कुटुंबाच्या ओढीने ते गावाकडे येत आहेत. गावात येताना गावाच्या चारही बाजूंनी काटेरी झुडपे टाकून नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील कोरोना सहाय्यता कक्ष आणि ग्रामपंचायतच्या वतीने येथील बसस्थानकावर बाहेरून आलेल्या लोकांच्या नोंदी घेऊन त्या लोकांची येथील  आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात केंद्रात तपासणी करून गावात घेत असले, तरी विषाणूची लक्षणे लवकर ओळखू येत नसल्याने पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणांहून आलेल्या लोकांविषयी नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून गावात असल्यास एकमेकांच्या संपर्कात माणूस येतोच. त्यापेक्षा आपल्या शेतात राहिलेले बरे, असं म्हणत काटीत  सरपंचासह गावातले जवळपास पन्नास कुटुंबिय आबालवृद्धासह शेतात जाऊन राहिले आहेत. येथील विष्णू ढगे यांचे एकूण 18 मानसांचे कुटुंब शेता शेजारील बंद पडलेल्या आश्रम शाळेत आपले बिऱ्हाड हलविले असून शाळेसमोरील मोकळ्या जागेत स्वयंपाकाची सोय केली आहे. काटीतील अनेकजण शेतात शेड मारुन जाण्याच्या तयारीत आहेत. अनेक आई-वडील पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी ठिकाणी कामानिमित्त, नौकरी निमित्त बाहेरगावी असलेल्या आपल्या मुला-मुलींच्या,नातवंडांच्या काळजीने व्याकुळ झाल्याचे चित्र सुध्दा पहावयास मिळत आहे. 

ग्रामीण व कृषिचे लोडशेडिंग बंद होण्याची गरज - सरपंच कोळी

   कोरोनाच्या भीतीने आणि शासनाने लावलेल्या संचारबंदी मुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंब राहण्यासाठी शेतात गेले आहे. काटीतील जवळपास पन्नास कुटूंबिय शेतात  राहण्यासाठी गेले असल्याचे सांगून लोडशेडिंगमुळे सर्वत्र अंधार असल्याने इकडे कोरोना व तिकडे अंधार अशी स्थिती असल्याने आणि अंधार दूर करणे हातात असल्याने सर्व लोडशेडिंग तात्काळ बंद करून ग्रामीण व कृषीचा अखंडित वीज पुरवठा होणे गरजे असल्याचे मत व्यक्त केले. त्याच प्रमाणे गावात विनाकारण फिरणाऱ्या तरूणांनी घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे आणि पोलीस बंदोबस्तात वाढ व्हावी असे मत काटीचे सरपंच आदेश कोळी यांनी दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.
 
Top