काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरातील गावांमधील भाजीपाला कोरोनाच्या साथीमुळे व्यापारी येत नसल्याने व वाहतूक पुर्णपणे ठप्प असल्याने तोडणी अभावी टोमॅटो, वांगी, दोडके, कोथिंबीर, मेथी,शेवगा आदी भाजीपाला शेतातच पडून असल्याने शेतकऱ्यांचे शेतात वारेमाप खर्च करूनही लाखो रुपयाचे नुकसान होत असल्याने शेतात केलेला खर्च वाया जाणार असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
काटीसह परिसरातील बरेच शेतकरी भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर असतात. या यावर्षी पुरेसा पाऊस झाल्याने बोअरच्या पाण्यावर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून ढबू, मिरची, टोमॅटो, वांगी दोडका, कलिंगड, काकडी, या भाजीपाल्याची लागवड केल्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन सुरू होताच कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद या मोठ्या बाजारपेठात जाणारा भाजीपाला, भाजीपाल्यांची वाहतूक थांबली, सर्व आठवडी बाजार बंद आहेत. भाजीपाला खरेदीसाठी येणारे व्यापारी फिरकेना झाले, बाजारपेठ बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागातून शहरात भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना जाता येत नसल्याने परिणामी भाजीपाला तोडणी थांबली आहे. ढबू मिरची, वांगी, मेथी टोमॅटो, हिरवी मिरची तोडणी न झाल्याने झाडाची वाढ थांबली आहेत. दोडका,काकडी,कारली हे वेलवर्गीय भाज्या आकाराने मोठ्या झाल्यात.
भाजीपाला लागवडीसाठी शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघने मुस्किल झाले आहे. येथील शेतकरी बाबा सोनवणे यांचेवर टोमॅटो, कोथिंबीर, मेथी हे पिक सोडून द्यायची वेळ आली. तर समाधान सोनवणे यांना, टोमॅटो, काकडी, बाबा बेग यांना टोमॅटो, शेवगा ही पिके सोडून द्यायची वेळ आली. हवामानातील बदल उन्हाची वाढलेली तीव्रता यावर मात करीत असलेल्या भाजीपाल्याची तोडणी बंद करावी लागल्याने कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.


