काटी : उमाजी गायकवाड

 कोरोनाने जगभर थैमान घातले असल्याने उदरनिर्वाहासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी गेलेले लोक आपल्या मूळ गावी काटी येथे येऊ लागले आहेत. बाहेरून गावी येणाऱ्या लोकांना गावात बिगर तपासणी करता गावात प्रवेश करता येऊ नये, अनावधानाने कोरोनाबाधित रुग्न गावात शिरेल आणि त्याचा संसर्ग अन्यजणांना पसरेल याची खबरदारी येथील ग्रामपंचायतचे सरपंच आदेश कोळी, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, गावातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेऊन गावात येणाऱ्या चारही प्रवेशद्वारावर  काटेरी झुडपे टाकून बाहेरून येणाऱ्यांसाठी मार्ग बंद केले असून येथील एस.टी. स्टॅण्डवर कोरोना सहाय्यता कक्षाच्या वतीने बाहेरून येणाऱ्यांसाठी कसून चौकशी करित आपल्या रजिस्टरमध्ये आलेल्या लोकांच्या नोंदी घेण्यात येत असून प्रत्येकाला येथील आरोग्य वर्धिनी केंद्रात जाऊन तपासणी करण्यासाठी सांगितले जात असून घराच्या बाहेर न पडल्याच्या सुचना केल्या जात आहेत. 

जीवावर उदार होऊन या राष्ट्रीय आपत्तीत कोरोना सहाय्यता कक्षातील सदस्य तलाठी प्रशांत गुळवे, मु.अ. एस. एम. संगमनेरकर, संजय जाधव, पोलीस पाटील सौ. म्हेत्रे, सहशिक्षक सुनिल खेंदाड, तानाजी शेळके, श्रीमती कोळी मॅडम, पंकज काटकर, हेरार काझी,  अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे, विष्णु कांबळे, विलास सपकाळ आदी सदस्य कोरोनाविरोधी जैविक युध्दात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. कोरोना सहाय्यता कक्ष आणि ग्रामपंचायतच्या वतीने गावनिहाय बाहेरून आलेल्या लोकांच्या याद्या तयार करणे, आजारी असतील तर त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेणे, कोरोनाबाबतची जनजगृती करणे ही कामे गाव आणि आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचा दुवा म्हणून व आपले गाव हेच आपले कुटुंब या भावनेने अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत 249 जणांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

 
Top