काटी : उमाजी गायकवाड
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मुंबई, पुणे, भिवंडी, कोल्हापूर आदी ठिकाणांहून 18 मार्च ते 22 मे या कालावधीत 329 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. सद्य स्थितीत येथील जिल्हा परिषद प्रशाला, मुकबधीर शाळा, मनाल इंग्लिश स्कूल, आणि होम क्वारंटाईन व शेतामध्ये 84 लोकांना क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे.
सध्याच्या स्थितीत देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासनाने काही अटी शर्ती शिथील करीत 31 मे पर्यंत देशभरात लाॅकडाऊनची मुदत वाढविली आहे. ही मुदत आणखी काही दिवस वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यातील मुबंई, पुणे, भिवंडी, कोल्हापूर, औरंगाबादसह विविध भागात अडकलेले मजूर आपल्या कुटुंबासह आपल्या गावकडे परतत आहेत. गावी आल्या नंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात येत आहे. आजपर्यंत क्वारंटाईनचा 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर तपासणी करून 245 लोकांना घरी पाठवण्यात आले आहे. कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, सरपंच आदेश कोळी, ग्रा.पं. कर्मचारी अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे यांच्यासह ग्रा.पं.सदस्य हे सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्व क्वारंटाईन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.
कोरोना सहाय्यता कक्षावर कक्ष प्रमुख प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, शिक्षकवृंद, पोलीस पाटील सौ. म्हेत्रे, पोलीस कर्मचारी,माजी सैनिक श्रीकांत गाटे,इजदानी बेग,
ग्रा.पं.कर्मचारी अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले आदीसह पोलीस मित्र परिश्रम घेत आहेत.
