काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख काटीकर( बी.एन. देशमुख) वय (85 वर्षे) यांचे मध्यरात्री 1:30 वाजनेच्या सुमारास औरंगाबाद येथील राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाचे वार्ता गावात समजताच गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाची वार्ता गावात पसरताच गावात संपूर्ण गावात शोककळा पसरली होती. सर्व दुकाने बंद कडकडीत बंद करण्यात आली होती. गावात दुपारी सर्वत्र शुकशुकाट दिसून आला होता. त्यांचे पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी खासदारअँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, विरोधीपक्ष नेते उध्दवराव पाटील यांचे ते भाच्चे होत. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. तात्यासाहेब पुरोगामी युवक संघटनेचे संस्थापक व दीर्घकाळ अध्यक्ष होते, मराठवाड्याच्या जडणघडणीत पर्यायाने महाराष्ट्राच्या मोजक्या पुरोगामी नेतृत्वापैकी एक, शेतकरी कामगार पक्षाचे मातब्बर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. तुळजापूर तालुक्यातील काटी गावाची ओळख बॅरिस्टर बी.एन. देशमुख यांचे गाव म्हणून संबंध महाराष्ट्राभर होती.
शेतमालाला हमी भाव, कामगारांच्या कष्टाला दाम व गोरगरिबांना न्यायदान तसेच मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे.उच्च व सर्वोच्च न्यायालयात ते वकिली करत असताना 1978 ते 1984 या कालावधीत राज्य विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. उस्मानाबादहुन लोकसभेची त्यांनी निवडणूकही लढविली होती. ते साम्यवाद विचारसरणीचे नेते होते. त्यानंतर त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. शेतकरी ,कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते.
सर्वसामान्यांचे प्रश्नावर लढणारऱ्या व महाराष्ट्राचे भूषण असलेले बॅरिस्टर बी.एन. देशमुख उर्फ तात्यासाहेबांच्या निधनामुळे मराठवाड्यासह काटी गाव पोरका झाला असून काटी गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने बंद करून येथील मुख्य बाजार चौकात ग्रामस्थांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

