हंजगी (अक्कलकोट), दि. ०७ :

तालुक्यात नेहमीच आस्मानी संकटाच्या काळात घटनेची वास्तव माहिती समाजापर्यंत पोहचवण्याचे काम हे  पत्रकार करत असतात. देशाला , समाजाला व तरुण पिढीला दिशा देण्याचे काम आज पत्रकारिता करत आहे. म्हणूनच आज ही लोकशाहीचा चौथा स्तंभ हा समाजात ताठ मानेने काम करत आहे.वृत्तपत्रे ही समाजमनाचा आरसा दाखवणारा अस्त्र आहे. आज पर्यंत जगातील सर्व क्रांत्या या साहित्यिक व पत्रकारांच्या लेखणीमुळेच घडल्या. लढाया या शस्त्राने जिंकता येत नाहीत. शस्त्रापेक्षा शास्त्राने, लेखणीमुळे लढाया जिंकता येतात .म्हणून नेहमीच आस्मानी संकटात अथवा आणीबाणीच्या काळात  पञकार सर्वांचा आधार बनून उभा राहतो. परंतु आता पञकारांना आधार देण्यासाठी समाज मात्र पुढे येताना दिसत नाही.

 सध्या कोरोना महामारी संकटात  समाजातील गरजू, गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी  प्रशासन आणि सामाजिक संस्था पुढे येताना दिसतात. समाजातील गरजूंची हालअपेष्टा होता कामा नये म्हणून आता समाजातील दानशूर व्यक्ती एकवटल्या आहेत.समाजातील दानशूर व्यक्ती प्रमाणे लोकप्रतिनिधींनी ही दक्षता घेताना दिसतात. परंतु जीव धोक्यात घालून दिवसरात्र जनमानसांचा आरसा बनून शहर आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांच काय ? तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या या लोकशाहीचा चौथा स्तंभ मात्र नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. समाजातील गरीब गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यासाठी पत्रकारांचा गराडा घेऊन जाणारे लोकप्रतिनिधी पेपरात फोटोसह बातमी छापून आली की ते कात्रण काढून फायलिला लावतात ,आणि  पत्रकारांकडून काम काढून घेण्यात धन्यता मानतात. 

अशा आस्मानी संकटाच्या काळात तुटपुंज्या पगारात काम करणाऱ्या पत्रकारांना  आर्थिक टंचाई भासत असेल याची साधी विचारपुसही कुणी करताना दिसत नाही.स्वत:चा जीव धोक्यात घालून मालकाशी इमान राखून बातमी देताना या पत्रकारांना मोठी कसरत करावी लागते .बातमीत कुठलीही चूक राहू नये म्हणून वारंवार बातमी वाचून खातरजमा करून पत्रकार बातमी देण्याचा सतत प्रयत्न करत असतो.कारण पत्रकारांची एक चूक नोकरी ही गमवू शकते.त्यातच पोलिस प्रशासनाला अंगावर घेऊन कधी कधी पोलीसांच्या लाठ्यांना ही त्यांना  सामोरे जावे लागते. परंतु आज पर्यंत याची दखल ना कुणी लोकप्रतिनिधी घेत ना काम करणारी कंपनी.

 सध्याच्या काळात पत्रकारांची अवस्था अत्यंत वाईट आहे. खिशात पैसे नाहीत, घरात धाान्य नाही, आणि बातमीसाठी कंपनीचा तगादा कायम आहे. जनसामान्यांचे प्रश्न तडीस नेणारी पत्रकारांची जमात सध्या अडचणीत आहे. चांगलं काम करणाऱ्या पोलीस,डाॅक्टर, नर्स व प्रशासनाची दखल घेतलेली  बातमी जनमानसा पर्यंत पोहोचविण्याचे काम करणारे पत्रकारच सध्या अडचणीत सापडले आहेत. या पत्रकारांची दखल घेण्यासाठी मात्र आज तालुक्यातून कोणीच पुढे येताना दिसून येत नाही. आज पर्यंत भूकंप, महापूर, अतिवृष्टी,रोगराई  आदी आस्मानी संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून पत्रकार हा समाजाचा आरसा बनून प्रामाणिकपणे काम करत असतो.या मुळेच सामान्य माणसांना घरी बसल्या ठिकाणी सर्व माहिती मिळू शकते. परंतु दुर्दैवाने याच संकटाच्या काळात एक माणूस म्हणून ही पत्रकारांची कधीच आठवण होताना दिसून येत नाही हीच तर खरी चौथ्या स्तंभाची शोकांतिका आहे.बातमीची गरज निर्माण झाल्यावरच पत्रकारांची आठवण येत असते. बाकीच्या वेळी मात्र नेहमीच पत्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसते.सध्या जिल्ह्यात  कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने सगळीकडे लाॅकडाऊन ,संचार बंदी लागू आहे. या कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने जनता भयभीत झाली आहे. सध्या नागरिक घरात बसूनच दिवस काढताना दिसतात. या नागरिकांची काळजी घेण्यासाठी पोलिस, डाॅक्टर,आरोग्य कर्मचारी यांच्याप्रमाणे पत्रकार बांधव देखील स्वत;चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. दिवसभरातील घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडत असतात. अशा चोख कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकार व त्यांच्या परिवार विषयी कोणीच विचारपूस करताना दिसत नाहीत.विचारपूस तर लांबच राहिली,  साधा एक फोन अथवा दिलासादायक शब्द कानी पडताना सुद्धा दिसत नााही. हीच खंत सध्या पत्रकार बांधवांना सतावत आहे.केवळ समाज बांधवांना न्याय देण्यासाठी व समाजाचे ऋण फेडण्यासाठी म्हणून संकटाच्या काळात मदत करण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडत असतो.मात्र संकटात धावणारा,मदत करणारा आपला पत्रकार बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुरताच आहे काय …? असा  प्रश्न सध्या पत्रकार बांधवांना सतावत आहे. गेल्या महिनाभर सर्वच क्षेत्रातील पत्रकार बांधव  कोरोनाच्या संदर्भातील माहिती जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी धडपड करताना दिसतात.सर्वच वृत्तपत्र दैनिकांना सध्या  एक रुपयांची जाहिरात नाही आणि दरमहा हजारो रुपये खर्च होतोय या मुळे पत्रकार बांधव दुहेरी संकटात सापडले आहेत. अनेकांना हा खर्च झेपत नाही म्हणून साप्ताहिकच बंद करावी लागली,  त्यातच ही आर्थिक मंदि किती काळ राहील ?  याची कल्पना येत नाही. पुढील किमान दोन वर्षे कशी काढायची या चिंतेने झोप लागत नाही. मोठ्या वृत्तपत्रातील अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यांना नवी नोकरी कशी मिळणार हा प्रश्न आहे. समाजातील या चौथ्या स्तंभाला सध्या वाली कोण ? आणि पत्रकार बांधव केवळ कौतुकाची बातमी देण्यापुरताच आहे काय …? असे असंख्य प्रश्न सध्या पत्रकार बांधवांना भेडसावत आहेत.
 
Top