तुळजापुर, दि. २९ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यासह देशात लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. असे असताना तुळजापुर शहरात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी तक्रार येथील सामजिक कार्यकर्ते विजय यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजने अंतर्गत राज्यातील सर्व दुकानदारांना तंबाखुजन्य पदार्थ विक्री न करण्याच्या सुचना या अगोदर केलेल्या असुन सुद्धा तुळजापूर शहरामध्ये काही जण अवैधरित्या गुटखा विक्री करीत असून गुटखा खाऊन थुंकण्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत असून जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देवून गुटखा विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विजय भोसले यांनी ऑनलाईन निवेदनाद्वारे केली आहे..
